गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांमुळे ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधींची रद्द झालेली खासदारकी, मविआची सभा, नाना पटोलेंची गैरहजेरी अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोलाही लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ विधान!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी झालेल्या सावरकर गौरव यात्रेमध्ये बोलताना संजय राऊतांवर टीका केली होती. “अलीकडच्या काळात बाजारबुणगेही पंतप्रधान मोदींवर बोलतात. त्या बाजारबुगण्यांना सांगू इच्छितो, सुर्याकडे पाहून थुंकाल, तर थुंकी तुमच्या तोंडावर पडणार आहे. सूर्यावर पडू शकत नाही. त्यामुळे हे राऊत, फाऊद, दाऊद जे असतील यांना सांगतो, मोदींकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुमची थुंकी तुमच्याच तोंडावर पडत आहे. त्याच थुंकीने लथपथलेला चेहरा पाहण्याची कोणाची इच्छा नाही”, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील आरोपांचा समाचार घेतला होता.

“राऊत, फाऊद, दाऊद जे असतील, यांना सांगतो…”, मोदींवरील ‘त्या’ विधानावरून फडणवीसांचा राऊतांवर हल्लाबोल

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर आज संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “मोदी हे सूर्यच आहेत. चंद्र आहेत. धुमकेतू आहेत. सर्वकाही आहेत. पण त्यांनी गेल्या काही काळात निरमा वॉशिंग पावडरचं उत्पादन सुरू केलं आहे, त्यावर बोला. आम्ही बाजारबुणगे आहोत, मग तुम्ही कोण आहात? गौतम अदाणीला का वाचवत आहात? किरीट सोमय्याला संरक्षण कोण देतंय? यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावं”, असं संजय राऊत यावेळी म्हणले.

“आम्ही श्वासही मोदींमुळेच घेत आहोत”

“नरेंद्र मोदी तेजस्वी सूर्य आहेत. देशात प्रकाश मोदींमुळेच पडलाय. संध्याकाळी शीतल चांदणं मोदींमुळेच पडतं. नद्या वाहतायत, समुद्र उसळतोय तेही मोदींमुळेच होतंय. आम्ही जो श्वास घेतोय, जी हवा आहे, ती मोदींमुळेच आहे. आम्ही त्याबद्दल काही बोलतोय का? आम्ही विचारतोय भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी का घालताय?” असा टोलाही संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

देवेंद्र फडणवीसांना करून दिली ‘त्या’ विधानाची आठवण!

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्यावरूनही टोला लगावला. “मी परवा देवेंद्रजींचं एक वक्तव्य ऐकलं की ‘माझी काही लोकांना अडचण होते कारण मी कठोर निर्णय घेतो. मी भ्रष्टाचार सहन करत नाही’ वगैरे. पंतप्रधानांनी सीबीआयच्या कार्यक्रमात भाषण केलं आणि सीबीआयला भ्रष्टाचार खणून काढण्याची सूट दिली. मग महाराष्ट्रात तुमचे आमदार, मंत्रिमंडळातल्या लोकांकडून भ्रष्टाचार होत असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी तुम्ही क्लीनचिट देत आहात”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut mocks devendra fadnavis on prime minister narendra modi pmw