मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीच्या उमेदवारीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. भाजपाकडून कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंना असहकार करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात कल्याण-डोंबिवलीतील वातावरण तापलं असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी यासंदर्भात श्रीकांत शिंदे व शिंदे गटाला टोला लगावला आहे.

संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्याण-डोंबिवलीत भाजपा आणि शिंदे गटात चालू असणाऱ्या सुंदोपसुंदीवर विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी शिंदेपुत्राचे अर्थात श्रीकांत शिंदेंचे फाजील लाड केल्याची सूचक प्रतिक्रिया दिली.

“आता त्यांना कळेल की…”

“आता त्यांचा-आमचा काही संबंध नाही. ते भाजपाशी आपलं गुलामीचं नातं निभावत आहेत. आमची २५ वर्षं त्यांच्याशी युती राहिली. नेहमीच भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी असा संघर्ष केला आगे. निवडणुकीतही उमेदवार पाडण्यासाठी ते आमच्याशी बंडखोरी करत होते. तरीही आम्ही हे नातं २५ वर्षं निभावलं. आता त्यांना निभावू द्या. आता त्यांना कळेल की शिवसेना कोणत्या संघर्षातून जात होती. आम्ही भाजपाशी नातं का तोडलं याचा अनुभव त्यांना घेऊ द्या”, असं संजय राऊत म्हणाले.

“आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनेसाठी खेचून घेतली होती. तेव्हा तिथे राम कापसे भाजपासाठी निवडणूक लढायचे. पण शिवसेनेनं ती जागा घेतली आणि निरंतर तिथे उमेदवार निवडून आले. पण आता मुख्यमंत्र्यांचे पुत्रच तिथून खासदार आहेत. पण तरी भाजपानं त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केलंय की तुम्हाला ती जागा मिळणार नाही. आता प्रत्येक जागेवर हाच प्रश्न निर्माण होणार आहे”, असं संजय राऊतांनी यावेळी नमूद केलं.

“शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली हे खोटं, खरं म्हणजे…”, संजय राऊतांचं मोठं विधान

“प्रत्येक जागेसाठी भाजपा यांना रडवणार”

“अशा घडामोडींकडे आम्ही फार गांभीर्याने पाहातच नाही. हे होणारच होतं. आणखी होणार आहे. कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनेशी, पक्षकार्याशी कोणताही संबंध नसताना श्रीकांत शिंदेंना देण्यात आली. त्यासाठी गोपाळ लांडगे यांना दिलेली उमेदवारी मागे घेण्यात आली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी शिंदे पुत्राचे हे फाजील लाड केले होते. त्यांना दोनदा सीट दिली. ते दोनदा निवडून आले. आता त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. आता प्रत्येक जागेसाठी भाजपा यांना रडवल्याशिवाय राहणार नाही”, असा टोलाही राऊतांनी लगावला.


Live Updates