अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांसह सरकारला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केली जात आहे. यासंदर्भात सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार जाहीरपणे आपला अजित पवारांना पाठिंबा असल्याचं सांगत असताना स्वत: अजित पवार किंवा शरद पवार यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडत नाहीयेत. त्यामुळे राज्यात सध्या कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून ते अजित पवारांसमवेत भाजपा-शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रानं दिलं आहे. या वृत्तावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“मविआतील तिन्ही घटकपक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भारतीय जनता पक्षाला वाटतेय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. २०२४पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्याचं त्यांचं कारस्थान आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? आमदार गेले असतील. २०-२५ आमदार जाणं म्हणजे पक्ष खिळखिळा होणं असं नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फुटला का? आजही हा पक्ष शरद पवार या नावाशी बांधलेला आहे. बातम्या येतात ४० फुटले, ५० फुटले. अशा बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत, त्या खोट्या आहेत. भाजपा या अफवा, वावड्या उठवतंय. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतंय. पण तसं काहीही होणार नाही”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या पोटात सगळ्यात जास्त गोळा आला असेल. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य पुन्हा एकदा मविआमधूनच शिखरावर जाणार आहे. त्यांच्याविषयीच्या बातम्यांचा मविआच्या एकीवर काहीही परिणाम होणार नाही. आज सकाळी आम्ही सगळे एकमेकांशी बोललो आहोत. तुम्ही जे आकडे सांगतायत, ते कुठून येतात हे मला माहिती नाही. एकाच वृत्तपत्राकडे हे आकडे कुठून येतात माहिती नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.