शपथविधी होऊन बारा दिवस उलटले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर सहमती होत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी थेट दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. भाजपा आणि शिंदे गटातील महत्वांच्या खात्यांवर अजित पवार गटाचा डोळा आहे. पण, ही खाती सोडण्यास शिंदे गट आणि भाजपातील विद्यमान मंत्री तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपा आणि शिंदे गटातून राष्ट्रवादीला खाती देण्यास आडकाठी आहे का? असे विचारले असताना संजय राऊत म्हणाले, “माझी माहिती आहे की, अजित पवारांचा गट ज्या खात्यांसाठी आग्रह धरून बसला आहे. त्या खात्यांबाबत दिल्लीतील नव्या बॉसने शब्द दिला आहे. हा शब्द पूर्ण होतो की नाही हे पाहूया. गृहनिर्माण, ग्रामविकास, अर्थखाते, समाजकल्याण ही खाती अजित पवारांच्या गटाने मागितली आहेत.”

हेही वाचा : खातेवाटपासंदर्भात अजित पवार-अमित शाह भेटीत काय चर्चा झाली? प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“अजित पवारांना अर्थखाते सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामाध्यमातून आपल्या लोकांना निधी वाटप करत गब्बर करण्यात येते. म्हणून मिंधे गटातील लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. याच लोकांनी अजित पवारांवर टीका करत शिवसेना सोडली आहे. त्याच अजित पवारांकडे निधी वाटपासाठी कागद घेऊन जावे लागणार आहे,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

हेही वाचा : ठाकरे गटाला धक्का, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा, ‘हे’ दोन आमदार इच्छुक

“एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी शपथ घेऊन एक वर्ष झालं. त्यांच्यातील लोकांनी शिवलेल्या कोटची मापे बदलली. तरी, मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी मिळत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, हिंदुत्व एका कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला आहे,” अशी टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.