विधान परिषदेवरील रखडलेल्या नियुक्त्या लवकर कराव्यात यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीबद्दल संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काही सूचक वक्तव्य केली आहेत. या भेटीनंतर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचंही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “भेटीनंतर राज्यपालांनी त्यांचा निर्णय कृतीतून दाखवावे. तिथले हसरे फोटो प्रसिद्ध झाल्यानं वातावरण प्रसन्न होतं असं वाटतंय. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील, असं वाटतंय”.
हेही वाचा – आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांचे आश्वासनच
राज्यापालांवर दबाव असेल तर त्यांनी सांगावं असं सांगत ते म्हणाले, “ते दबावामुळे निर्णय घेत असतील तर त्यांनी ते जाहीरपणे सांगावं. राजभवन आणि सरकारमध्ये आतापर्यंत संघर्ष झाल्याचा इतिहास नाही. आणि तो जर होत असेल तर तो का होतो याचा विचार राजभवनाने करायला हवा. हायकोर्टाने या प्रकरणात पडण्याची गरज नाही. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी देणं हे त्यांचं काम आहे. १२ आमदार हे तालिबानमधून आलेले नाही, ते गुंड नाहीत. ते कलाकार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण काम केलंय. त्यामुळे राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. कालच्या भेटीनंतर राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील असं वाटतंय”.
ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा…
विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली असता त्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सुमारे तासभराच्या भेटीत राज्यासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यात पूरपरिस्थिती, पीकपाणी, करोना, करोना वाढू नये म्हणून केंद्र सरकारने केलेल्या सूचना आदी विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना माहिती अवगत करून दिली तर राज्यपालांनी काही प्रतिप्रश्न केले, असे अजित पवार यांनी सांगितले.