सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल समोर आला. यावेळी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडं सोपावला आहे. त्याचपार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुक्रवारी इशारा दिला होता.
“सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी चौकट आखून दिली आहे. त्यानुसारच निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी काही उलटसुलट केलं, तर आम्ही निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तशीच पुन्हा न्यायालयात दाद मागू,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा : “मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारावा, कारण या दोन नेत्यांनी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
यावर ‘आम्हाला कोणी मुदत देऊ शकत नाहीत,’ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटल्याचं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना विचारलं. त्यावरून संजय राऊतांनी नार्वेकरांना ठणकावलं आहे. “विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षांसारखं वागावे. आरे-तुरे आणि जर-तरची भाषा कोणी करू नये,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षासारखं वागावं. ते घटनेच्या खुर्चीवर बसले आहेत. आरे-तुरे आणि जर-तरची भाषा कोणी करू नये. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळायला हवेत,” असा सल्ला संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांना दिला.
हेही वाचा : कर्नाटकात प्रारंभीचे कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
“लोकशाहीत असे पक्षांतर करणाऱ्यांविषयी प्रेम असेल तर…”
“अनेक पक्षांतर करून विधानसभा अध्यक्ष सध्याच्या पक्षात पोहचले आहेत. त्यामुळे पक्षांतराविषयी नार्वेकरांना फार घृणा असेल, असे वाटत नाही. लोकशाहीत असे पक्षांतर करणाऱ्यांविषयी प्रेम असेल तर, त्यांनी मनात ठेवावं. पण, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि भूमिका त्यांना मान्य करावी लागेल,” असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.