ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील एका कसिनोतील (जुगार खेळण्याचं ठिकाण) फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच बावनकुळेंनी कसिनोत साडेतीन कोटी डॉलर उडवले असल्याचा अप्रत्यक्ष दावाही संजय राऊतांनी केला. राऊतांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा कुठल्याही प्रकारच्या फोटोच्या आधारे कोणाची प्रतिमा तुम्हाला खराब करता येत नाही. ३४ वर्षे राजकारणात मोठा संघर्ष करुन आम्ही ही प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. बावनकुळेंच्या या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळेंचं म्हणणं बरोबर आहे, हीच बाब त्यांनी त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना सांगावी. आमच्यात माणुसकी आहे, त्यामुळे आम्ही एकाच फोटोवर थांबलो आहोत, असा इशारा संजय राऊतांनी दिला. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “आईचं डोकं फुटलं आणि बाळाच्या अंगावर रक्त…”, मनोज जरांगेंनी सांगितला लाठीमारबाबतचा घटनाक्रम
बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना हे सांगावं. ते राजकीय विरोधकांची ज्याप्रकारे प्रतिमा खराब करतात. त्या सगळ्या राजकीय लोकांनी ४०-५० वर्षे राजकारणात आणि समाजकारणात घालवली आहेत. तुम्ही आमच्यावर, आमच्या कुटुंबावर किंवा आमच्या नेत्यांवर ज्या प्रकारे आरोप आणि हल्ले करता, ते कोणत्या संस्कृतीत बसतं. तीही विकृतीच आहे.”
हेही वाचा- “लाठीमार होताच मनोज जरांगे घरात जाऊन झोपले”; भुजबळांच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर, म्हणाले…
“आता तुम्हाला कळलं असेल, काय होतं आणि काय घडतं. तरी आमच्यात माणुसकी आहे, त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो आहोत. मी परत सांगतो, आमच्यात संस्कृती आणि माणुसकी आहे. त्यामुळे आम्ही एका फोटोवर थांबलो आहोत. आमचे त्यांच्याशी (बावनकुळेंशी) व्यक्तीगत भांडण नाही. पण भारतीय जनता पार्टी ज्या सैतानी पद्धतीने, निर्घृणपणे, विकृतपणे महाराष्ट्रातील आपल्या राजकीय विरोधकांवर चिखलफेक करते, खोटे गुन्हे दाखल करते, यंत्रणा वापरते, बदनामी करते, खोटे पुरावे उभे करते, ते चालतं का? बावनकुळ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना समजावून सांगावं. मी परत सांगतो, आम्ही एका फोटोवरच थांबलो आहोत, कारण आमच्यात माणुसकी आहे” असा इशारा संजय राऊतांनी दिला.