Sanjay Raut On Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेच्या उपचारासाठी आधी १० लाख रुपये भरण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैशाअभावी रुग्णालयाने पीडितेला रुग्णालयात दाखल करुन घेतलं नाही आणि यातच एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विविध संघटना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निषेधार्थ आंदोलन करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आरएसएसची लोक काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच ‘मुख्यमंत्री पदाला जो दर्जा लागतो तो दर्जा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही, पण तो दर्जा येईपर्यंत त्यांचं मुख्यमंत्री पद जाईल’, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणासंदर्भात एका संघटनेनं आंदोलन केलं. त्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ते आंदोलक शो करत आहेत. पुण्याच्या या घटनेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, दोन चिमुकले पोरके झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या आंदोलनकर्त्यांना शो करतात असं म्हणतात. एवढं भंपक राज्य या महाराष्ट्रात कधी कोणाचं आलं नव्हतं”, अशा शब्दात राज्य सरकारवर संजय राऊत यांनी टीका केली.

‘…म्हणून रुग्णालयावर कारवाई नाही’

“आंदोलकर्त्यांना तुम्ही शो म्हणता? का तर तुमच्या आरएसएसची लोक त्या रुग्णालयात काम करतात म्हणून तुम्ही तसं बोलता? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सदस्यांची सर्व बॉ़डी ही भारतीय जनता पक्षाची समर्थक आहे. त्यामुळे त्या रुग्णालयावर कारवाई होत नाही”, असा आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

‘…तोपर्यंत मुख्यमंत्रिपद जाईल’

“खरं तर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ती लेवलच नाही. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस बसलेत, पण मुख्यमंत्री पदाला एक दर्जा लागतो, तो दर्जा त्यांच्याकडे नाही. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, मनोहर जोशी यांचा एक दर्जा होता. त्या दर्जाला येईपर्यंत यांचं (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री पद जाईल”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.