Sanjay Raut News : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची पाच ते सहा मते फुटल्याचा आरोप केला जात आहे. या आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केल्याचा दावा करण्यात येतोय. तसंच, महाविकास आघाडीतील आमदारांनी आम्हाला समर्थन दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत खुलासा आलेला नाही. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाने कोट्यवधी रुपये देऊन आमदारांना विकत घेतल्याचा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
“महाराष्ट्राचं सरकार बेकायदा आहे हे न्यायालयाने सातत्याने सांगितलं आहे. मागच्या वर्षीच्या सुनावणीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही सांगितलं आहे, तरीही न्यायालयात यावर अंतिम सुनावणी होत नाही. हे आपल्या न्यायव्यस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैवं आहे. संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं जाहीर केलं. पण खरं म्हणजे महाराष्ट्रातील सरकार हीच संविधानाची हत्या आहे”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “पैशांच्या बळावर ज्या पद्धतीने क्रॉस व्होटिंग करून घेतलं, ती सुद्धा संविधानाची हत्या आहे. यावर न्यायालय काही करणार आहे की नाही? अमित शाह या देशाचे गृहमंत्री असून त्यांना संविधानाची चिंता आहे. मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील असं त्यांचं सरकार वागत आहेत का? ते महाराष्ट्रात गैरसैविधानिक सरकार चालवत आहेत. हे राज्याचं दुर्दैवं आहे.”
हेही वाचा >> Sanjay Raut : “शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळणं हाच मोठा घोटाळा”, संजय राऊतांचा टोला
फुटलेल्या आमदारांवर काँग्रेसने कारवाई करायचं ठरवलं असेल तर स्वागत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दहाव्या शेड्युलनुसार न्याय पाहिजे, पण आम्हाला फक्त तारखा दिल्या जातात. प्रत्येक तारीख आम्हाला मिळतेय ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे”, असं ते (Sanjay Raut) म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीतही २०० कोटींचा निधी दिला
“राज्यसभेतसुद्धा २०० कोटींचा निधी दिला. ८ लाख कोटींचं सरकारवर कर्ज आहे. २०० कोटींचा निधी उधळला गेला. १० कोटी ते २५ कोटीपर्यंत रोख रक्कमा देण्यात आल्या. काही आमदारांना जमिनी दिल्या हे संविधानाला धरून आहे का? तुम्ही परिपत्रक काढलं की २५ जून संविधान हत्या दिवस म्हणून पाळणार. पण आता जे चाललं आहे ते संविधानाला धरून आहे का? समाजवादी पार्टी, एमआयएम हे वेगळ्या विचारसरणीचे पक्ष मानतात, त्यांनी कोणाला मतदान केलं हे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे”, असंही ते म्हणाले.
“टेम्पो आणि ट्रकने पैसे दिले गेले आहेत. एका पक्षाचे उमेदवार बनता आणि आमदार म्हणून निवडून येता. पण तुम्ही गुप्त मतदानात दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला मतदान करता”, असाही संताप त्यांनी व्यक्त केला.