शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कधीही घराबाहेर पडले नाहीत, त्यामुळे आम्ही बंडखोरी केली, असा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जातो. शिवाय भाजपा नेत्यांचाही हाच आरोप आहे. या आरोपावरून आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिंदे गटासह भाजपावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे घराबाहेर न पडण्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचं काम काय असतं? त्यांना लोकांनी राज्याचा कारभार किंवा प्रशासन चालवण्यासाठी निवडून दिलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाणं हे त्यांच्या पक्षाचं काम आहे. पक्षातील इतर नेते किंवा मंत्रीही लोकांमध्ये जाण्यासाठी असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नियमबाह्य काम करायला तुम्ही सांगत आहात का?” असा सवाल राऊतांनी विचारला. ते ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत बोलत होते.
हेही वाचा- “घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
राऊत पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दीड ते दोन वर्षे देशात कडक लॉकडाऊन होता. तुमच्याच पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. तुमचे पंतप्रधान स्वत: तोंडाला मास्क लावून घरात बसले होते. तुमचे केंद्रीय मंत्री आणि राज्यपालही घरात बसले होते. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावं, अशी तुमची भूमिका असेल तर तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही खोटारडे आणि ढोंगी आहात. दीड ते दोन वर्ष केवळ महाराष्ट्र किंवा देशच नव्हे तर संपूर्ण जग करोना लॉकडाऊनच्या विळख्यात होतं.”
“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं?” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल!
“आताही चीनमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. हा विषाणू आपल्या देशात, राज्यात येऊ नये, म्हणून काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची पुरेपूर काळजी घेत होते. कारण नियम पाळायला स्वत: पासून सुरुवात करायची असते. लोकांमध्ये जाऊन गर्दी केली आणि नुसते कागदावर कोंबडे मारले म्हणजे कामं होतं, असं अजिबात नाही. ज्या गर्दीत तुम्ही कागदावर सह्या करता, त्यातील किती लोकांची कामं होतात. एकाचही होत नाही. तुमचे ४० आमदार सोडले तर कुणाचंही काम होतं नाही” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.