ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार राहुल कूल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कूल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत संजय राऊतांनी आज दौंड तालुक्यातील वरवंड येथे ‘पोलखोल’ सभा घेतली आहे. या सभेतून राऊतांनी राहुल कूल यांच्यासह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल कूल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे सादर करण्यासाठी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन महिन्यापासून वेळ मागतोय, पण ते वेळ द्यायला तयार नाहीत. मी येतो म्हटलं की ते पळून जातात, असं विधान राऊतांनी केलं. ते वरवंड येथील ‘पोलखोल’ सभेत बोलत होते.

हेही वाचा- “अजितदादा आज पुन्हा गायब…”, चंद्रकांत पाटलांचा टोला!

यावेळी राऊत म्हणाले, “हे बेकायदेशीर आणि बोगस राज्य आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मी गृहमंत्र्यांकडे वेळ मागत आहे. माझं सरकारकडे कोणतंही वैयक्तिक काम नाही. मी गेली ४०-४२ वर्षे राजकारणात आहे. २२-२३ वर्षांपासून मी खासदार आहे. मी कोणत्याही वैयक्तिक कामासाठी मंत्रालयात जात नाही. पण मी दोन कामांसाठी फडणवीसांकडे वेळ मागितली. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना भंगारात जातोय. शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. तुमचे लाडके चेअरमन राहुल कूल यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून ठेवला आहे. त्याचा ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे. त्यांनी अगदी लहान-लहान गोष्टींत पैसे खाल्ले आहेत.”

हेही वाचा- ५०० कोटींचा घोटाळा प्रकरण: भीमा पाटस कारखान्यावर जाताना पोलिसांनी संजय राऊतांना अडवलं

“पैसे खायची पण एक प्रतिष्ठा असते. राजकारणात सन्मानाने पैसे खायचे असतात, तेही तुम्हाला जमत नाही. याचा खुलासा करण्यासाठी मी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे वेळ मागतोय. मला राज्याच्या हिताची माहिती द्यायची आहे. पण ते माझ्यापासून दूर पळून जातायत. मी येतो म्हटलं की ते पळून जातात. तुम्ही कुणाला वाचवत आहात? भ्रष्टाचाऱ्याला पाठिशी घालत आहात का? शेवटी मी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. आता सीबीआय काय करतंय बघू… मग मी ईडीकडे तक्रार दाखल करेन. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाईन. २०२४ ला आपलं सरकार येणारच आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे आपलं सरकार येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोण वाचवतं, तेच मी पाहतो…तुम्हाला ५०० कोटी पचू देणार नाही” अशा शब्दांत राऊतांनी राहुल कूल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on devendra fadnavis and rahul kool money laundering case 500 crore scam bhima patas sugar factory rmm
Show comments