Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी हे मुंबईत महायुतीचे आमदार आणि मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदींच्या मुंबई भेटीबद्दल तसेच आजच्या कार्यक्रमापासून धनंजय मुंडेना दूर ठेवल्याच्या मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, “मुंबई सगळ्यांचं स्वागत करते, ते तर देशाचे पंतप्रधान आहेत. आमची धारावी लुटू देऊ नका अशी मागणी केली आहे. त्या संदर्भात काही घोषणा करतात ते पाहावं लागणार आहे. बाकी पंतप्रधान मणिपूरला केव्हा जातायत? हा मोठा प्रश्न आहे. ते लवकरच जातील अशी आमची अपेक्षा आहे. आता ते मोकळे आहेत. दिल्लीच्या निवडणुका झाल्या की त्यांना फार निवडणूक प्रचाराचं काम नसेल, मग त्यांनी मणिपूरला जावं”.
धनंजय मुंडेंवर अन्याय का?
पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी ते महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवलं असल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे आज परळी दौऱ्यावर आहेत. याबद्दल विचारले असता धनजंय मुंडे यांनी कार्यक्रमापासून दूर ठेवलं की नाही याबद्दल आपल्याकडे अधिकृत माहिती नसल्याचे संजय राऊत म्हणाले. “अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर स्वत: पंतप्रधानांनी जाहीर मंचावरून आरोप केले होते. मग त्यांना पण दूर ठेवणार आहेत. ही सगळी सोंगं-ढोंगं आहेत.अजित पवार यांच्यावर जे पंतप्रधान दोन दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात, अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करतात, ते आज मंचावर असणार आहेत. खरोखर तसं असेल तर(धनंजय मुंडे यांना दूर ठेवलं) मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, असेही राऊत म्हणाले.
“महायुतीमध्ये ४० टक्के लोकं हे कलंकीत आहेत, आणि ते कलंकित आहेत हे स्वत: देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी वारंवार सांगत आले आहेत. मग आता ते कसे स्वच्छ झाले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय हा काय प्रकार आहे?”, असेही राऊत म्हणाले.
परळी बंद ठेवणे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कारडवर मकोका लागल्यानंतर परळीत बंद ठेवण्यात आला. या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, “वाल्मिक कराडला मकोका लावणे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पंतप्रधान मुंबईत असताना महाराष्ट्रातील एका भागात मणिपूरप्रणाणे हिंसाचार होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. एखाद्या गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणवून घेणारे लोकं रस्त्यावर उतरतात, हिंसाचार करतात, परळी बंद ठेवतात, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात हा काय प्रकार आहे?”
आम्ही एखादं आंदोलन केलं तर विरोधकी पक्षांना परवानगी मिळणार नाही. आमच्या लोकांना तुरूंगात टाकतील. मग इथे का शांत बसत आहेत. कारवाई झाली आहे, प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. आता सर्वांनी शांतता पाळली पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.