शिवसेनेचा दसरा मेळावा ही राजकीय वर्तुळात विशेष चर्चेची आणि उत्सुकतेची बाब मानली जाते. शिवसेना पक्षप्रमुख यावेळी सडेतोड राजकीय भूमिका मांडत असतात. याच दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी २०२४मध्ये शिवसेनेचं राष्ट्रीय राजकारणात काय स्थान असेल, याविषयी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनी २०२४मध्ये शिवसेना राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा मोहरा आणि केंद्रात सर्वोच्च स्थानी असेल, अशी भूमिका मांडली आहे.

“आम्ही ठकास महाठक आहोत”

भाजपाकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेविषयी आणि आरोपांविषयी संजय राऊत यांनी यावेळी टोला लगावला. “विरोधी पक्ष अनेक खोटी प्रकरणं उभी करून महाविकासआघाडीला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण आम्ही ठकास महाठक आहोत. आम्ही सोडत नाहीत. उद्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख या सगळ्यांचा समाचार घेतील. त्यांना शिवसेना काय आहे हे उद्या कळेल. आम्ही ओढून-ताणून कुणाला निशाण्यावर आणत नाही. आम्हाला ती खाज नाही. पण आमच्या अंगावर कुणी आलं तर आम्ही त्याला सोडत नाही. या मेळाव्यातून देशाला विचारांची एक दिशा दिली जाते”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“भाजपाने देशाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला”

ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एनसीबी अशा यंत्रणांचा देशात गैरवापर होत असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. “देशात एक प्रकारची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाही आहे हे सांगावं लागतं हे दुर्दैवं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सूडाचं राजकारण होत आहे. नवाब मलिक यांच्या जावयाच्या प्रकरणात सत्य समोर आलं आहे. राजकीय व्यक्ती असल्यामुळे त्यांच्यावर असा हल्ला झाला आहे. वीर सावरकर यांनी माफी मागितली हे भाजपानंच जाहीर करून टाकलं. सावरकर हे देशातल्या क्रांतीकारकांचे मुकुटमणी आहेत. भाजपा नेहमीच म्हणत आला की सावरकरांनी कधीच ब्रिटिशांची माफी मागितली नाही. पण काल भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनीच गांधींच्या सांगण्यावरून माफी मागितली असा एक नवा अध्याय देशाच्या इतिहासात लिहिला गेला. हे विषय दसरा मेळाव्यात नक्कीच चर्चेला येतील”, असं संजय राऊतांनी यावेळी नमूद केलं.

“महाभारतात शेवटी कौरवांचा नाश झाला”

राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता शरद पवार, उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये आहे, असं सांगतानाच संजय राऊतांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. “राज्यात सुरू असलेल्या प्रकाराला सूडाचं महाभारत म्हणतात. महाभारतात शेवटी कौरवांचा नाश झाला. कौरव देखील असेच सूडाने वागत होते. आम्ही आमच्या पक्षाचा विचार मांडतो, आमची भूमिका मांडतो हे भाजपाला मान्य नाही. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करायचा आणि आमच्या नेत्यांवर दहशत निर्माण करायची. त्यातून तुम्हाला सत्ता मिळणार असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. पण आमच्या पाठीला कणा आहे हे लक्षात ठेवा. आम्ही मोडू पण वाकणार नाही. इतर राज्यांना भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास आहे. तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे”, असं राऊत म्हणाले.

२०२४ मध्ये शिवसेना कुठे असेल?

दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय राजकारणातील वाटचालीविषयी यावेळी संजय राऊतांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. “आज जे राजकारण चालू आहे, त्याची सव्याज परतफेड केली जाईल. २०२४ ला पाहा काय होतंय. २०२४मध्ये देशाचं राजकारण पूर्णपणे बदललेलं असेल. राष्ट्रीय राजकारणात वेगळा सूर्य तुम्हाला तळपताना दिसेल. त्यामुळे आता तुम्हाला कितीही उपदव्याप करायचे असतील, ते करून घ्या. तुमचा पैसा, तुमची दहशत, तुमची कपटनिती २०२४ मध्ये काम करणार नाही. २०२४मध्ये शिवसेना केंद्रात सर्वोच्च स्थानी असेल आणि राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचा मोहरा असेल”, असं ते म्हणाले.

Story img Loader