Sanjay Raut on Eknath Shinde : स्वित्झर्लंड मधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री रवाना झाले. या दौऱ्यात शिवसेनेचे मंत्री उदय सामंतही गेले आहेत. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावी गेल्याने त्यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे.
“एकनाथ शिंदेंचं दरे हे त्यांचं दावोस आहे. तिथे जाऊन ते पक्षात, कुटुंबात आणि कार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक आणतात. एकनाथ शिंदे कायम अस्वस्थ असतात. त्यांनी आता नागा साधूंबरोबर कुंभमेळ्यात जाऊन बसायला हवं. नागासाधूही अस्वस्थ असतात. अघोरी विद्या करतात, नाचतात, तंबूत बसतात. कोणी आयआयटीवाला बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. त्यामुळे अस्वस्थ मंत्र्यांनी कुंभमेळ्यात ध्यानधारणा करावी”, असं संजय राऊत म्हणाले.
“एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, तसं ते गावी जातात. त्यामुळे नाराजीचं कारण आम्हाला कळलं पाहिजे. शिवसेना संपली नाही, ती संपणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली ती पुन्हा उसळेल. ही भाजपाची कुटनीती आहे, त्यांच्याबरोबर चांगले संबंध असलेल्यांना ते उद्ध्वस्त करतात”, असं संजय राऊत म्हणाले.
उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उदय सामंत दावोसला गेले आहेत. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतांना दावोसला नेलेयं. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले”, असं संजय राऊत म्हणाले.
सैफचा हल्लेखोर बांगलादेशी, हा राजकीय दावा
“पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. जर बांगलादेशी या मुंबईत घुसले असतील आणि ते अशाप्रकारचे गुन्हे करत असतील तर याला नरेंद्र मोदींचं सरकार जबाबदार आहे. दिल्लीत, पश्चिम बंगाल, मुंबईमध्ये बांगलादेशी आहेत. बांगलादेशी चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित असलेल्या सैफ अली खानच्या घरावर हल्ला करतो. हा सर्व प्रकार अत्यंत रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडताय. त्यामुळे हा भाजपाचा डाव आहे, असं मी म्हणेन”, असं संजय राऊत म्हणाले.