एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात केलेल्या बंडखोरीला आज ( २० जून ) वर्षपूर्ती झाली आहे. एक-एक करत चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. पण, याबाबत खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ शोच्या नव्या भागात संजय राऊतांनी हजेरी लावली. यावेळी संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांचं बंड, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे”, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं टीकास्र; म्हणाले, “अडीच वर्षं…!”

“आमदार सोडून जाणार आम्हाला माहिती होतं”

शिवसेनेतील गळती थांबणार कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. आमदार सोडून जाणार तुम्हाला माहिती होतं का? असा प्रश्न सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी संजय राऊतांना विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “आमदार सोडून जाणार आम्हाला माहिती होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते. बाकीचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी फोडले.”

“…मी फक्त साहेबांचा शब्द पूर्ण केला”

यावेळी नारायण राणे यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यात नारायण राणे म्हणतात की, “भारतात मतदार यादीत नाव नसेल, तर लोकप्रतिनिधी होता येत नाही. मी फक्त साहेबांचा शब्द पूर्ण केला. संजय राऊतांना खासदार केलं.” नारायण राणेंच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर”, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “शरद पवारांनी…”

“…तर राणेंचं केंद्रीय मंत्रीपद जाऊ शकते”

“हे महाशय खोटे बोलत आहेत. त्यांचं असं विधान आहे की, माझं मतदार यादीत नाव आणि नंबर नव्हता. त्यांनी तेव्हाचा माझा फॉर्म पाहिला पाहिजे. या वक्तव्यावर त्यांचं केंद्रीय मंत्रीपद आणि खासदारकी जाऊ शकते,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on eknath shinde devendra fadnavis and amit shah over shivsena dispute ssa