केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. नाव आणि पक्षचिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा पक्षबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटाचे नेते’शिवगर्जना’ यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा घेणार आहेत.
या सभेवरून शिंदे गटाकडून टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे उरलेले पदाधिकारी सोडून जाऊ नये, म्हणून ठाकरे गटाकडून अशा प्रकारच्या सभा घेतल्या जात आहेत, अशी टीका शिंदे गटाकडून केली जात आहे. शिंदे गटाच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ कागदावरची शिवसेना आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंच्या सभेची माहिती देताना संजय राऊत म्हणाले, “आज संध्याकाळी कोकणात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. ही सभा अतिविराट होईल. कोकण कायमच शिवसेनेचा गड राहिला आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या वाढीमध्ये, संघर्षामध्ये कोकणचं योगदान मोठं राहिलं आहे. कोकणाने नेहमी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. त्यामुळे आज खेडमध्ये जाऊन उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात अशाप्रकारच्या अनेक सभा होतील. उद्धव ठाकरे स्वत: तिथे जाणार आहेत. यानंतरची सभा मालेगावात होणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.”
पदाधिकारी पक्ष सोडून जातील म्हणून सभा घेतल्या जात आहेत, या विरोधकांच्या टीकेबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “ज्यांना निघून जायचं होतं, ते निघून गेले आहे. आता सगळे निष्ठावंत उरले आहेत. ज्यांना पळून जायचं होतं, ज्यांना पलायन करायचं होतं, असे सगळे लोक निघून गेले आहेत. ते निघून गेल्यानंतर आजही शिवसेना त्याच ताकदीने उभी आहे. निघून गेलेल्या लोकांमुळे शिवसेनेवर अजिबात परिणाम झाला नाही. शिंदे गटाला कागदावर नाव आणि चिन्ह मिळालं. पण शिवसैनिक आणि जनता मिळाली नाही. शिवसैनिक आणि जनता कुणाला द्यायची, त्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही. हा कागदावरचा निर्णय आहे, कागदावरच राहील.”