Sanjay Raut On Uddhav Thackeray and Raj Thackeray : राज्याच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती करण्याच्या संदर्भात एका मुलाखतीत बोलताना सूचक भाष्य केलं होतं. मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळात उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना प्रतिसाद देत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका मांडली.

त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यास काही अटी ठेवल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबर युती करण्यास कोणत्या अटी ठेवल्या आहेत का? याविषयी संजय राऊत यांनी ठाकरे गटाची सविस्तर भूमिका आज माध्यमांशी बोलताना मांडली. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अटी ठेवल्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“काही लोकांना दोन्ही भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे अशा प्रकारचे काटे मारत असतात. राज ठाकरे यांनी एक विषय मांडला. तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. राज ठाकरे यांनी विषय मांडल्यानंतर त्यानंतर लगेच काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद देखील महाराष्ट्राच्या हिताचा होता. आता यामध्ये अटी-शर्ती आल्या का? तर नाही आल्या. मला सांगा कोणती अट आणि कोणती शर्त आहे? जर दोन पक्षाचे नेते ते भाऊ आहेत, ते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या विषयांवर सहमती होतेय, तर त्यामध्ये जास्त वादविवाद करणं हिताचं नाही, या मताचा मी आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“मला सांगा त्यात अट आणि शर्त कोणती आहे? कोणतीही नाही. राज ठाकरे म्हणत आहेत की महाराष्ट्र हितासाठी आणि उद्धव ठाकरे हे देखील म्हणत आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मग प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजपा बसत नाही. ही अट नाही, तर लोकभावना आहे. जर याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे. हा विषय विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही महाराष्ट्र हितासाठी काम करत आहोत. मराठी माणसांचा स्वाभिमान हेच आमचं ध्येय आहे. आता जर मतभेद आणि वाद दूर ठेऊन जर दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. यामध्ये कोणतीही अट किंवा शर्त उद्धव ठाकरे यांनी ठेवलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या, जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या हिताचे शत्रू आहेत, त्यांच्या पंक्तीलाही बसू नका. यात कोणती अट आणि शर्त आहे? अजिबात नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.