आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी चालू आहे. युती आणि आघाडीत जागावाटपासाठी चर्चा चालू आहेत. महाराष्ट्रातील ४८ जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. महायुतीतल्या जागावाटपाच्या चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. तर महाविकास आघाडीचं जागावाटप जवळजवळ निश्चित झाल्याचं ठाकरे गटातील खासदार संजय राऊत आणि राष्ट्रावादीच्या सरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, काँग्रेस राज्यातल्या ४८ जागांवर चाचपणी करत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. तसेच काँग्रेसला महाराष्ट्रात ठाकरे गटापेक्षा जास्त जागा हव्यात असं सांगितलं जात आहे. या अफवांवर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले, काँग्रेसला जास्त जागा हव्यात असं तुम्ही काही पत्रकार म्हणताय. परंतु, काँग्रेसच्या कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याने असं वक्तव्य केल्याचं मी कुठेही ऐकलं नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रमुख नेते आणि खासदार राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापैकी कोणीही, कुठेही अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही. बाकी इतर कुणी काही बोलत असेल तर ते फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही.
ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, जागावाटपावर आम्ही आधीच सांगितलं आहे की जिंकेल त्याची जागा… फक्त संख्या वाढवायला जागा मिळणार नाही. कोणालाही संख्या वाढवायला जागा मिळणार नाही. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो अथवा काँग्रेस, कोणत्याही पक्षाला अधिक जागा मिळणार नाहीत. ज्या जागेवर आम्हाला खात्री आहे की आम्ही जिंकू, तीच जागा आम्हाला मिळेल. एखाद्या जागेवर आमच्याकडे उमेदवार असेल तर ती जागा आम्हाला मिळेल. तसेच एखाद्या जागेवर आमच्याकडे उमेदवार नसेल आणि तुमच्याकडे (काँग्रेस किंवा राष्ट्रवादी) तगडा असेल तर ती जागा तुम्हाला देऊ, असं आधीच ठरलं आहे.
हे ही वाचा >> “विष्णूचे १३ वे अवतार आहात, तर…”, ईव्हीएमवरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “तुमच्या प्रिय इस्रायलमध्ये…”
काँग्रेसबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने अद्याप जास्तीच्या जागा मागितल्या नाहीत. महाराष्ट्रात काँग्रेसचा पाया मजबूत आहे आणि तो कायम राहील. काँग्रेस विदर्भात मजबुतीने उभी आहे. त्यानंतर मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रातही काँग्रेसची ताकद आहे. माझी आत्ताच आमदार अमित देशमुख यांच्याशी चर्चा झाली. मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान ३०० ठिकाणी या देशात काँग्रेस आणि भाजपाची सरळ लढत आहे. या जागा २०२४ मध्ये भारताचं भवितव्य ठरवतील. मला असं वाटतं की, या ३०० पैकी किमान १५० ते १७५ जागांवर काँग्रेस सध्या मजबूत स्थितीत आहे.