अलीकडच्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालांचा राजीनामा मंजूर केला आहे. तर, रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. रमेश बैस हे सध्या झारखंडचे खासदार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांना सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “नव्या राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं. राजभवनाचं भाजपा मुख्यालय बनवू नये. विरोधी पक्षाचा घटना आणि लोकशाहीनुसार असलेला आवाज रमेश बैस यांनी ऐकायला हवा. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे, याचं भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे.”

हेही वाचा : अग्रलेख : राजभवनातील राधाक्का!

“सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्याबाबत सुनावणी सुरु आहे. घटनाबाह्य सरकारचे निर्णय, शिफारसी किती आणि कशा मान्य करायच्या, यांचेही राज्यपालांना भान ठेवावं लागेल. नाहीतर पुन्हा एकदा संघर्ष होणार,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राचा विजय!’ राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना…”

“…तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो”

भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “राज्यपालांनी भाजपाचे राजभवनातील एजंट म्हणून काम पाहिलं, ते घटनाबाह्य होतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना कोंडी करण्याचा प्रयत्न कोश्यारींनी केला. मंत्रीमंडळाच्या अनेक शिफारसी कोश्यारींनी नाकारल्या. पण, याबाबत राज्यपालांना दोष देत नसून, ते गृहमंत्रालयाच्या दबावात होते. व्यक्ती ही वाईट नसते. मात्र, दबावाखाली काम करावं लागतं, तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on maharashtra new governor ramesh bais ssa