Sanjay Raut On MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युतीच्या संदर्भात एका मुलाखतीत बोलताना मोठं विधान केलं. ‘मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत, एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण नाही’, असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट ठाकरे गटाबरोबर युतीचे संकेत दिले. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद देत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहोत, असं म्हणत राज ठाकरे यांच्या विधानाला प्रतिसाद दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं.

या चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भूमिका मांडत राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही असं म्हणत मोठे संकेत दिले. मात्र, मनसे आणि ठाकरे गटाची युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार? ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? यासंदर्भातील प्रश्न संजय राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. यावरही संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत जर राज ठाकरे यांनी पुन्हा सकारात्मक भूमिका घेतली तर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारला. यावर ते म्हणाले की, “आता हा तुमचा प्रश्न पुढचा आहे. या प्रश्नावर मी आत्ता उत्तर देणार नाही. महाविकास आघाडी ही आमची राजकीय व्यवस्था आम्ही महाराष्ट्रासाठी केलेली आहे. राज ठाकरे हे सध्याच्या परिस्थितीत भाजपा किंवा शिंदे गट यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत. राज ठाकरे यांचा वापर करून भाजपा महाराष्ट्रात मराठी माणसांना त्रास देण्याचं कारस्थान पडद्यामागून करत आहे. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर हे मराठी माणसांवर उपकार होतील”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीबाबत एकमेकांशी चर्चा करणार का?

“राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीबाबत दोघे एकमेकांना का बोलणार नाहीत? मी आताच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आज चर्चा केली, कालही या विषयांवर चर्चा केली. त्यामुळे आम्ही हवेत बोलत नाहीत. ही मुंबई आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसांवर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावच लागेल. मात्र, आम्ही वाट पाहू, अधिक चांगलं घडण्याची आम्ही वाट पाहू. राज ठाकरे यांच्याकडून जर एखादी चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा कंरटेपणा आम्ही करणार नाहीत. सर्व ठाकरे एक आहेत. आता काही मतभेद झाले असतील”, असंही राऊत म्हणाले.

‘आम्ही सकारात्मक भूमिकेतून पाहतो…’

“भारतीय जनता पक्षाला ठाकरे हे नाव नष्ट करायचं आहे. अशावेळी जर दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करेल. आम्ही आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर प्रतिक्षा करणार आहोत. आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहोत. शेवटी महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय आहे”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.