Sanjay Raut On Udhhav Thackeray-Raj Thackeray Meet : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन नेते एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे भाचे यश देशपांडे यांच्या लग्न सोहळ्याला दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांमध्ये संवाद रंगल्याने दोघे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीत मनसेचा पार धुव्वा उडाला तर शिवसेनेचीही पीछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर लगेचच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान हा भेटीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या चर्चेमध्ये माझ्यासारखा माणूसही सहभागी असतो. कारण मी राज ठाकरेंबरोबर मी देखील जवळून काम केलेले आहे. त्यांचं आणि माझं अनेक वर्ष मित्रत्वाचं नातं राहिलं आहे. उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते माझ्या जवळचे आहेत. काल दोन भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद आहे. ठाकरे कुटुंबाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे. कोणत्याही ठाकरेंकडे त्याच दृष्टीने मराठी माणूस पाहातो”.
“दोघांचे पक्ष वेगळे आहेत. राज ठाकरे यांनी स्वत:चा एक पक्ष स्थापन केला आहे. त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही, आमच्या पक्षाची भूमिका आहे की, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि आम्हाला त्यांच्याबरोबर काम करता येणार नाही. महाराष्ट्र, मुंबई लुटण्यात, शिवसेना फोडण्यात या तिघांचा मोठा सहभाग आहे. अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल आणि दुर्देवाने राज ठाकरे अशा लोकांची भलामण करतात, त्यांच्याबरोबर राहतात. एकावेळी भाजपाबरोबर आम्हीही राहिलो होतो असा आमच्यावर आरोप होईल, नक्कीच राहिलो होतो, तेव्हा राज ठाकरेही आमच्याबरोबर होते. हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह आहेत”, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दोन्ही नेते एकत्र येणार का?
महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते आगामी काळात एकत्र येऊन काम करण्याच्या शक्यतेबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, “कुटुंब एकच असतं, अजित पवार-शरद पवारही भेटतात. रोहित पवार देखील त्यांच्या काकांना (अजित पवार) भेटतात. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेही वेगळ्या पक्षात असूनही भाऊ म्हणून एकत्र येतात. कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे एक मुलगा तिकडे आहे. कुटुंब एक असतं, पण कुटुंब म्हणून एक आल्यावर देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने काही प्रवाह असतात, त्या प्रवाहात आम्हाला वाहत जाता येत नाही. शेवटी उद्धव आणि राज ठाकरे हे भाऊ आहेत, हा निर्णय त्यांनी घ्यायचा आणि त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल” असेही संजय राऊत म्हणाले.