Sanjay Raut on Narayan Rane : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडण्यात येणार आहे. याप्रकरणी दिशा सालियनचे वडील कोर्टात गेले असून त्यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी व्हावी, याकरता याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणी याआधीही राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरलं होतं. तसंच, आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात घेऊ नये याकरता उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना दोनवेळा फोनही केला होता, असं खुलासा नारायण राणे यांनी काल (२२ मार्च) केला. दरम्यान, यावर आता संजय राऊतांनीही नारायण राणेंवर टीका केली आहे.
संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. त्यांना नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारण्यात आलं. संजय राऊत म्हणाले, “माझी यासंदर्भात उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी याचा पूर्णपणे इन्कार केलाय. असा कोणताही फोन यासंदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही, संभाषणही झालेलं नाही. मिलिंद नार्वेकरांशीही बोलणं झालं आहे, तेही म्हणाले की मीही कोणाला फोन लावून दिला नाही. नारायण राणे कशाच्या आधारावर असे आरोप करत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांची प्रकृती बरी नाहीय, हे पाहावं लागेल. सत्तरी पार केली आहे, त्यांच्या तब्येतीची आम्हाला चिंता वाटते. उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांनी स्पष्ट सांगितलं आहे की असं कोणतंही संभाषण झालेलं नाही.”
आमचे केंद्रीय मंत्री सांभाळून घ्या, अमित शाहांचाही आला होता फोन
“नारायण राणेंना जेव्हा अटक केली, त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून फोन आले होते की त्यांना सांभाळून घ्या. त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना विकार आणि त्रास आहे. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सूचना दिल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. केंद्रातूनही फोन आले होते. अमित शाहांचे फोन आले होते उद्धव ठाकरेंना, की आमचे केंद्रीय मंत्री आहेत सांभाळून घ्या म्हणून. त्यांच्या कुटुंबियांकडून फोन आले होते.. आता या गोष्टी काढायच्या असतात का?”, असा सवाल संजय राऊतांनी केला.
“हे दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं. खोटा मुलामा देऊन जुन्या गोष्टी काढल्या जातात. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं. राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात संवाद कायम होता. कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती. अमित शाहांचं राज्य आल्यापासून संपूर्ण देशात असं घाणेरडं राजकारण सुरू झालंय”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.