केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ हे पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या निर्णयाला अनपेक्षित निर्णय म्हटलं आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाकडून आता नवीन पक्षचिन्ह मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत हे नुकतेच कोकण दौऱ्यावरून परतले आहेत. माघारी आल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी नवीन निवडणूक चिन्हाबाबत चर्चा सुरू असतल्याचं सांगितलं आहे. ठाकरे गटाला सध्या निवडणूक आयोगानं’मशाल’ हे पक्षचिन्ह दिलं आहे. पण हे चिन्ह समता पक्षाचं आहे, त्यामुळे समता पक्षाने या चिन्हावर आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा- निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट स्थगिती देईल? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…

अंधेरी, कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट ‘मशाल’ चिन्ह वापरू शकतात. मात्र, त्यानंतर कदाचित ‘मशाल’ हे चिन्हही काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून नवीन पक्षचिन्ह मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा- निवडणूक आयोगाच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “या निर्णयाविरोधात…”

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “मी आता कोकणच्या दौऱ्यावरून परत आलो आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाची चोरी झाली आहे. हे चोर कोण आहेत? याचा तपास आम्ही घेत आहोत. अलीकडच्या काळात मंदिरावर दरोडे पडतायत, मंदिरांचे सोन्याचे कळस चोरीला जातायत, मूर्तींच्या चोरी होतायत. अगदी याचप्रमाणे आमच्या मंदिरातील शिवसेनाप्रमुखांचं धनुष्यबाण चोरीला गेलं आहे. या चोरीसाठी दिल्लीतील एखाद्या महाशक्तीनं काय मदत केली? याचा तपास आम्ही करतोय. पण लोकांना आम्ही सांगू इच्छितो की, धनुष्यबाणाची चोरी झाली असून संशयित चोर कोण आहेत? याची माहिती लवकरच जनतेसमोर आणू…”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on new election symbol meeting with uddhav thackeray at matoshree rmm
Show comments