Sanjay Raut on PM Narendra Modi : राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून घमासान सुरू आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ही कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. तर, त्या दृष्टीने आता राज्य सराकारनेही प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतिक असल्याचं महाविकास आघाडीतील काही नेते म्हणत आहेत. त्यामुळे ही कबर कायमस्वरुपी ठेवण्याची सूचना त्यांच्याकडून केली जातेय. दरम्यान, हा वादंग सुरू असतानाचा संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैफ अली खानवर टीका केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “औरंगजेबाची कबर आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. पण त्याचवेळेला ज्याने या देशात सर्वांत जास्त हिंसाचार केला, हत्या केल्या, मंदिरं पाडली, त्या तैमुरच्या नावाने एक फिल्मस्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो. त्या तैमुरचं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी कौतुक करतात.
हिंदुत्त्ववाद्यांना तैमुर चालतो
“जेव्हा सैफ अली खान आणि त्याची पत्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटायला गेले होते तेव्हा तैमुर आला नसल्याने पंतप्रधानांना चिंता वाटली होती. त्यांनी त्याला उचलून घेतलं असतं, पप्पी घेतली असती. मग हिंदुत्त्ववाद्यांना तैमुर चालतो”, असं संजय राऊत म्हणाले.
“लालकृष्ण आडवाणींची अवस्थाही शाहजहांसारखी झाली आहे. लालकृष्ण आडवाणी हे देशातील राम मंदिराचे शिल्पकार आहेत. त्यांनी हे हिंदुत्त्वाचं शिल्प उभं केलं, पण त्यांना शाहजहांसारखं एकांतवासात ठेवलंय. असे हे लोक दांभिक लोक आहेत”, अशी टीका राऊतांनी केली.
दोन्ही आत्महत्याच
“सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोन्ही आत्महत्याच आहेत, हे वारंवार सिद्ध झालंय. राजकीय बदनामीचा कट करण्याकरता या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमूक आहे कधी तमुक आहे अशा पद्धतीचा रंग देण्यात आला. पाच वर्षांनी दिशा सालियनच्या वडिलांना पुढे केलं. याचा तपास पुन्हा करावा याकरता याचिका कोर्टात केली आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण संसदेपर्यंत नेलं होतं. औरंगजेबाचं राजकारण सुरू आहे, तसं मृतांचं राजकारण सुरू आहे. मृतांनाही भाजपा सोडत नाही. चांगल्या घरातील व्यक्ती मरण पावतात, त्यांचीही बदनामी केली जाते. सर्वांना आता त्रास होतोय, भाजपाचा हेतु सफल होत नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.