नवी दिल्लीत संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी ( १९ सप्टेंबर ) नव्या संसदेतील कामकाजाचा पहिला दिवस पार पडला. या दिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. प्रफुल्ल पटेल यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर याचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै २०२३ रोजी दोन गट पडले. अजित पवार यांच्या गटानं शिंदे-फडणवीस सरकार पाठिंबा दिला. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची महत्वाची भूमिका होती, असं सांगितलं जातं. पटेल यांनी यादरम्यानच्या काळात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अशातच नव्या संसद भवनातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी दोन्ही नेत्यांचा एकत्रित फोटो प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केला आहे.
हेही वाचा : “सुप्रिया सुळेंना नैराश्य आलं आहे, वैफल्यग्रस्त भूमिकेतून…”, अजित पवार गटातील नेत्याची टीका
या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असा प्रश्न संजय राऊत यांना प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारला. त्यावर राऊत म्हणाले, “त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम त्यांनी पाहावा. यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत? हे मला माहिती नाही. पण, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत.”
हेही वाचा : “अजित पवारांचा अपमान करण्यासाठी भाजपानं…”, पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या
“शरद पवारांनी फुटीर गटाविरुद्ध निवडणूक आयोग आणि न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच, फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिकाही केली आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.