शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी अलीकडेच बाजार समितीच्या निवडणुकीत १७ पैकी १७ जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. संबंधित सर्व जागा जिंकल्या नाहीत, तर मिशी काढेन, हा माझा शब्द आहे, असं विधान बांगर यांनी केलं होतं. पण बांगर यांच्या पॅनेलला केवळ पाच जागा जिंकता आल्या. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर तुफान टोलेबाजी केली आहे.
मिशा काढा अन्यथा हजामत करायला न्हावी पाठवतो, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत म्हणाले, “कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल हे भारतीय जनता पार्टीच्या किंवा सरकारच्या पूर्णपणे विरोधात आहेत. काही विशिष्ट भाग वगळला तर सर्वत्र शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे.”
हेही वाचा- “अमित शाह यांच्या भीतीने…”, ‘वज्रमूठ’ सभेवरून आशिष शेलारांचं टीकास्र!
“बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकरी, कष्टकरी मतदान करतो. या मतदारसंघात शिवसेना आतापर्यंत कधीही लढत नव्हती. आता तिथे शिवसेनेचे पॅनेल्स मोठ्या ताकदीने निवडून आले आहेत. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या की, आम्ही हारलो तर मिशा काढू… आता त्यांनी मिशा काढल्यात का बघा… नाहीतर तुमची (संतोष बांगर) हजामत करायला आणि भादरायला आम्ही इथून न्हावी पाठवतो,” अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा- “पुन्हा वादळ येईल आणि…”, राजकीय भूकंपाबाबत बच्चू कडूंचं सूचक विधान!
दरम्यान, राऊत यांनी सोमवारी पार पडलेल्या ‘वज्रमूठ’ सभेवर भाष्य केलं. “कालची सभा बघून भाजपाच्या दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी गुप्त बैठक घेतली असेल आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढील दहा वर्षे घेऊ नये, असा एखादा ठराव मंजूर केला असेल. तुम्ही कितीही ठराव आणि डराव मंजूर केले, तरी महाराष्ट्रात आणि देशात सत्तापरिवर्तनाच्या दिशेनं लोकांची पावलं पडत आहेत. हे कालच्या सभेतून दिसून आलं,” असंही राऊत म्हणाले.