मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवल्यानंतर आमदार संदीप क्षिरसागर यांचाही बंगला पेटवण्यात आला आहे. आमदार आणि खासदारांच्या घरावरील हल्ले सुरू असताना शिंदे गटाच्या दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहित राजीनामा दिल्याची घोषणा केली.
शिंदे गटातील राजीनामा सत्रावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्र सोडलं आहे. शिंदे गटाचे खासदार राजीनामा देण्याचं ढोंग करतायत. खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देता येतो का? असा सवालही संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; मराठा आरक्षणावरून आणखी एका खासदाराचा राजीनामा
संजय राऊत म्हणाले, “शिंदे गटाच्या खासदारांनी ढोंग करू नये. ही सगळी भाजपाची पिल्लावळ आहे. त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. कालच एका राजीनामा दिलेल्या खासदारांना नारंगी सदरा घालून ‘कॅनॉट प्लेस’मध्ये मस्तपैकी फिरताना पाहिलं. हे सगळे मस्तवाल लोक आहेत. ढोंग करतायत. लबाड लांडगं ढोंग करतंय, अशी स्थिती आहे.”
“खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देता येतो का? खरं म्हणजे आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांच्या राज्यात हिंसाचार होतोय. भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना यासाठी मुख्यमंत्री केलं, काय तर म्हणे मराठा ‘फेस’ (चेहरा) आहे, इथे मराठ्यांच्या तोंडाला फेस आलाय. मराठा मरतोय. मराठा जळतोय. एक मराठा मुख्यमंत्री अपयशी ठरतोय, हा कसला ‘फेस’ आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी २०२४ च्या निवडणुकीत पूर्णपणे पराभूत होणार आहे. त्याचं श्रेय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन मराठा नेत्यांना जाईल,” असंही संजय राऊत म्हणाले.