Sanjay Raut : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका मुलाखतीत बोलताना शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याबाबत भूमिका मांडली. ‘मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत, एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण नाही. विषय फक्त इच्छेचा आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद देत एका सभेत बोलताना मोठं भाष्य केलं. ‘आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहोत’, असं म्हणत मनसेच्या युतीबाबत काही अटी ठेवल्या.
त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाची भूमिका मांडली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर आता पुन्हा राज ठाकरे यांच्याकडून काय प्रतिसाद येतो याची प्रतिक्षा करणार आहोत. तसेच या सगळ्या गोष्टींकडे आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून पाहतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“ते देखील ठाकरे आहेत, हे देखील ठाकरे आहेत. दोघे भाऊ आहेत, हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेदामधून दोन मार्ग तयार झाले असले तरीही उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्राच्या हिताचा राहिला आहे. आता राज ठाकरे यांचं विधान मी देखील ऐकलं. त्यात राज ठाकरे यांनी म्हटलं की महाराष्ट्र हितासाठी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की कोणतंही भांडण नाही किंवा वाद नाही आणि जरी वाद असले तरी वाद मिटवायला वेळ लागत नाही. मात्र, भूमिका एवढीच आहे की लोकसभा निवडणुकीवेळी आणि विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्राच्या मूळावर येणाऱ्या ज्या फौजा आहेत, त्यांच्याशी आपण काही संबंध ठेवता कामा नये. आता आमची भाजपाशी २५ वर्ष युती होती. त्यातील काही काळ राज ठाकरे हे शिवसेनेत असताना ते देखील सहभागी होते. पण जेव्हा शिवसेनेवर घाव घालण्याचं काम झालं तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं. आता लोकसभेच्या निवडणुकीत आमची भूमिका होती की महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की अशा काही शक्ती आहेत की त्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसांचं नुकसान व्हावं यासाठी जे कारस्थान करतात. त्यांच्या पंक्तीला आम्ही बसणार नाहीत. अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही, अशी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ही भूमिका कोणी घेत असेल तर स्वागत आहे, त्यानंतर आम्ही पुढील चर्चेला किंवा पुढील प्रतिक्रिया सांगू”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“भारतीय जनता पक्षाला ठाकरे हे नाव नष्ट करायचं आहे. अशावेळी जर दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करेल. आम्ही आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर प्रतिक्षा करणार आहोत. आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहोत. शेवटी महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय आहे”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.