विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हा विधानसभेचे ३९ आमदार एकनाथ शिंदेंबरोबर शिवसेना सोडून गेले. परंतु त्या काळातही कायंदे ठाकरे गटातच थांबल्या. परंतु बंडखोरीला एक वर्ष पूर्ण झाल्यावर आता आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मनिषा कायंदे यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, संजय राऊतांनी त्यावर बोलणं सुरुवातीला टाळलं. नंतर ते म्हणाले, ४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून बाई (मनिषा कायंदे) गेल्या असं मी काल व्यासपीठावर ऐकलं. मला त्याबद्दल काही माहिती नाही, मी यावर फार बोलणार नाही.

हे ही वाचा >> “आमच्या देवी-देवतांची खिल्ली उडवणारे…”, आमदार मनिषा कायंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल, म्हणाल्या…

खासदार संजय राऊत म्हणाले, हे लोक येतात कुठून, जातात कसे, हा संशोधनाचा विषय आहे. भविष्यात आम्हाला यावर विचार करावा लागेल. मुळात हे लोक कुठून येतात, कुठे जातात याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांना पक्षात कोणी आणलं आणि कोणी विधान परिषदेवर पाठवलं यातलं काहीच माहिती नाही. असे लोक येतात आणि जातात. मी त्यांना कचरा म्हणतो. हवा आली की हा कचरा उडून जातो. आम्ही अशा लोकांना मानत नाही. मी अशा लोकांशी ओळख ठेवत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on why manisha kayande joins shiv sena shinde grup asc