उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात थांबायला हवं. तिथे भाजपाची परिस्थिती गंभीर आहे, असे ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. महत्त्वाचे म्हणजे यावेळी बोलताना उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“१० वर्ष सत्तेत असतानाही भाजपाला मत मागण्यासाठी देशभर फिरावं लागतं आहे. महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांना यावं लागतं आहे. खरं तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातच थांबायला हवं. तिथे भाजपाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुनही टीकास्त्र सोडलं. “पंतप्रधान मोदी हे सरकारी खर्चावर देशभरत फिरत आहेत. सरकारी खर्चावर ते निवडणुकीचा प्रचार करत आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून…

“उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद”

यावेळी बोलताना उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. “उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित राहतील. महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही, हे सांगणारी ही पत्रकार परिषद असेल, खऱ्या अर्थाने बिघाडी असेल तर ती महायुतीत आहे. आम्ही एकत्र आहेत”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नि…

दरम्यान, संजय राऊत यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. याबाबत विचारलं असता, “उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. याचा अर्थ सर्व मतभेद दूर झाले आहेत. कोणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. आगाडी-युती करताना जागावाटपावरून एखाद्या जागेवरून थोडेफार मतभेत होऊ शकतात. ते दूर केले जाऊ शकतात”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on yogi adityanath maharashtra visit mahavaikas aghadi press conference spb
Show comments