रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारख्या खासदारांची परंपरा आहे. पण येथे सामान्य माणसालाच संपवण्याचे काम सध्या चालू आहे. शिवसेना गोळीला घाबरत नाही. वेळ पडल्यास गोळीला गोळीनेच उत्तर आम्ही देऊ, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला. सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा खासदार संजय राऊत, या मतदारसंघातील युतीचे उमेदवार विनायक राऊत, भाजपचे आमदार प्रमोद जठार इत्यादींच्या उपस्थितीत मालवण येथे झाला. याप्रसंगी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, नाथ पै, दंडवते यांची संसदेत वैचारिक दहशत होती. पण आता राष्ट्रीय राजकारणातून सिंधुदुर्ग जिल्हा नामशेष झाला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार जठार निवडून आले. सामान्य कार्यकर्ता दहशतीला घाबरत नाही, हेच त्यातून सिद्ध झाले. आगामी निवडणूक, रात्र वैऱ्याची नाही, तर वैऱ्यालाच रात्र दाखवण्याची आहे.
सेनेच्या आमदारांना  मताधिक्याचे उद्दिष्ट
दरम्यान या निवडणुकीत मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांना युतीच्या उमेदवारासाठी मताधिक्याचे उद्दिष्ट (टार्गेट) ठरवून दिले असल्याचे खासदार राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मागील निवडणुकीत सेनेची ताकद असलेल्या पट्टय़ातही युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते, याकडे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले की, अशा प्रकारांचा आम्हालाही बंदोबस्त करता येतो आणि तसा यंदाच्या निवडणुकीत केला आहे. युतीचे उमेदवार विनायक राऊत यांना सेनेच्या आमदारांनी या निवडणुकीत किती मताधिक्य मिळवून द्यायचे, याचे निश्चित उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून त्यानुसार मतदानावर लक्ष ठेवले जाईल. या निवडणुकीत महाराष्ट्रातून युतीचे ३८ उमेदवार विजयी होतील आणि त्यापैकी सुमारे १५-१६ जण सेनेचे असतील, असा अंदाज व्यक्त करून खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्या विरोधात उमेदवार उभे केल्यामुळे काहीही फरक पडणार नाही. राज्यात भाजप-सेना युती अभेद्य आहे. मात्र (नितीन गडकरींसारख्या) बाहेरच्या नेत्याने येऊन येथे ढवळाढवळ केली तर शिवसेना समाचार घेणारच, असे त्यांनी ठासून सांगितले. या प्रकरणी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी, यापुढे असे प्रकार होणार नाहीत, अशी हमी दिली असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत आणि युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यातील कथित भेटीबद्दल टिपण्णी करताना अशा भेटी होतच राहतील, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader