Sanjay Raut Press Conference vs BJP : पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. काय उखडायचं ते उखडा, बघू कोणात किती दम आहे, असंही ते काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यामुळे हे भाजपाचे साडेतीन लोक कोण? संजय राऊत नक्की कोणते खुलासे करणार ? याकडे सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलेलं होतं.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने भाजपा शिवसेना आणि ठाकरे परिवारावर चिखलफेक करत असून पक्ष म्हणून त्याला उत्तर दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, आता आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईतल्या शिवसेना भवन इथं होत असलेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना भवनाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

Live Updates

Sanjay Raut Press Conference vs BJP : मुंबईतल्या शिवसेना भवन इथं होत असलेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदारांना बोलवण्यात आलं आहे.

18:58 (IST) 15 Feb 2022
संजय राऊतांना गरज लागली तेव्ही मी आर्थिक मदत केली - मोहित कम्बोज

मोहित कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते. त्यानंतर आता भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी संजय राऊत मला ओळखतात आणि त्यांना मी अनेकवेळा आर्थिक मदत केली आहे, असे म्हटले आहे. वाचा सविस्तर...

18:43 (IST) 15 Feb 2022
"पत्रकार परिषद आहे की क्रिकेटची मॅच आहे", मनसेचा टोला

"अभी तो टॉस हुआ है - आदित्य ठाकरे

पत्रकार परिषद म्हणजे सिक्सर आहे - सुप्रिया सुळे

शिवसेना भवनाबाहेर मोठं स्क्रीन

अरे, पत्रकार परिषद आहे की क्रिकेटची मॅच आहे??", अशी प्रतिक्रिया मनसेचे उपाध्यक्ष आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे.

18:18 (IST) 15 Feb 2022
किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

2017 साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचे नाव घेतलं आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध 10 खटले दाखल केले आहेत तर  अजून तीन तीन खटले पाईपलाईनमध्ये आहेत. मला त्यांची परिस्थिती समजते. मी आणखी एका प्रकरणाचं स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेलो नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे.

18:09 (IST) 15 Feb 2022
"...यातून वास्तव समोर आलं आहे"; नाना पटोलेंनी मांडली काँग्रेसची भूमिका

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसची भूमिका मांडताना म्हटले की, “संजय राऊत यांनी जी पत्रकारपरिषद घेतली त्यात वास्तव समोर आलेलं आहे. आम्ही दुधाने धुतलेलो आहोत, असा हेका लावणारी भाजपा आज त्यांच्या भ्रष्टाचारांमुळे संपूर्ण उघडी झाली आहे. या निमित्त ईओडब्ल्यूच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या सगळ्याची चौकशी करून, योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी काँग्रेसची आहेच. ”

17:37 (IST) 15 Feb 2022
प्रश्नोत्तराला नकार, फक्त नेहमीप्रमाणे गोंधळ - केशव उपाध्ये

नुसताच गवगवा ना मुद्दे ना पुरावे ना प्रश्नोत्तर! मुद्देच नव्हते त्यामुळे नाशिक सह मुंबई बाहेरून सैनिक लोक आणण्याची वेळ आली का ? खरेखुरे पुरावाचा कागद पण नाही, प्रश्नोत्तराला नकार, फक्त नेहमीप्रमाणे गोंधळ, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिली आहे.

17:19 (IST) 15 Feb 2022
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है ! - अमृता फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या पत्रकार परिषदेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !

17:15 (IST) 15 Feb 2022
९ कोटीचं कार्पेट? राऊतांच्या आरोपावर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले...

मी चाणक्य आहे असा अभास संजय राऊतांना झाला आहे. राऊतांच्या ईडी मागे लागली हे मला माहीत नाही. राज्य सरकारने माझ्या मुलीच्या लग्नातील खर्चाची चौकशी केली आहे. आपल्यावर आरोप झाले म्हणून माझ्यावर आरोप करू नये. संजय राऊत नऊ कोटींचं नाही तर नऊ लाखांचं कार्पेट म्हणाले. शिवसेनेचे कॅबिनेटमध्ये मंत्री होते. त्यांना त्यावेळी कळलं नाही का? शिवसेनेचे मंत्री जागरूक होते, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

17:08 (IST) 15 Feb 2022
वनमंत्री राहिलेल्या भाजपा नेत्याने मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटीचं कारपेट टाकलं : संजय राऊत

https://twitter.com/LoksattaLive/status/1493546695669710850

17:05 (IST) 15 Feb 2022
ते साडे तीन नेते कोण? उद्यापासून कळेल- संजय राऊत

कितीही धमकावा महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार. हा फक्त ट्रेलर आहे. येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रं, आणखी व्हिडिओ समोर येणार.उद्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळेल. जसजसे आत घुसू तसतसे भाजपला कळत जाईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

16:48 (IST) 15 Feb 2022
हिंमत असेल तर ईडीने माझ्या घरी यावं - संजय राऊत

ED वाले ऐका , या माझ्या घरी, मी लढणार, जितेंद्र नवलानी कोण आहे ? हे नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील ED च्या लोकांचा घसा सुकेल.गेले ४ महिने ED च्या नावावर वसुली सुरू आहे, ७० बिल्डरकडून सुरू आहे, हे ED च्या काही अधिकाऱ्यांना माहीत आहे. मी याबाबत मोदी, अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे. अशा ४ एजंटनी ३०० कोटी रुपये वसूल केले आहेत. - राऊत

16:47 (IST) 15 Feb 2022
किरीट सोमय्यांवर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप

पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली - संजय राऊत

16:26 (IST) 15 Feb 2022
किरीट सोमय्या म्हणजे मुलुंडचा दलाल - राऊत

ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने केला आहे, मुलुंडच्या दलालाने. माझं त्याला आव्हान आहे, आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन - संजय राऊत

16:21 (IST) 15 Feb 2022
...तेव्हा तेव्हा माझ्या नातेवाईकांच्या घरावर छापे पडले!

ज्या ज्या वेळी मी म्हणालो की महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, त्या त्या वेळी माझ्या नातेवाईकांवर, कुटुंबियांवर छाडी पडल्या. माझ्या मुलांना फोन करून धमक्या दिल्या की तुमच्या वडिलांना उद्या पोलीस घेऊन जातील. इतकं घाणेरडं राजकारण भाजपाकडून सुरू आहे. - संजय राऊत

16:16 (IST) 15 Feb 2022
कितीही नामर्दानगी करून पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही - राऊत

पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संजय राऊत म्हणाले, "सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे. ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही."

15:47 (IST) 15 Feb 2022
संजय राऊत शिवसेना भवनाकडे निघाले...

काही वेळातच सुरू होणाऱ्या या पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत सामना कार्यालयातून शिवसेना भवनाकडे निघाले आहेत. वाटेत ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांचा आशिर्वाद घेऊन शिवसेना भवन येथे येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

15:37 (IST) 15 Feb 2022
मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त; वाहतुकीचे मार्गही बदलले

मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. राम गणेश गडकरी चौक, दादर येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल उद्यान ते गडकरी जंक्शन ते राजाबढे चौक दोन्ही मार्गांवर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक संथ गतीने चालू राहू शकते. त्यामुळे या वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

15:34 (IST) 15 Feb 2022
झुकेंगे नही म्हणत शिवसैनिक सज्ज

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद काही वेळातच सुरू होत आहे. भाजपाच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या पत्रकार परिषदेत संजय राऊत कोणता मोठा खुलासा करणार, काय बोलणार याकडे सध्या लक्ष लागलेलं आहे. दरम्यान शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिक दाखल झाले आहेत. या शिवसैनिकांनी झुकेंगे नही असा मजकूर लिहिलेले टी-शर्ट परिधान केले आहेत.

शिवसेना आणि भाजपा यांच्यातला संघर्ष रंगण्याची चिन्हं दिसत आहेत. शिवसेनेच्या वतीने आज दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे. आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होत असलेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त वाढवायला सुरुवात झाली आहे.

पोलीस अधिकारी, ट्रॅफिक पोलिस अधिकारी दाखल होत तयारीचा आढावा घेत आहे. शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली असून सर्वेलन्स व्हॅन देखील सेना भवन परिसरात बघायला मिळत आहे. दुपारपासून शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी आज शिवसेना भवनात दाखल होणार आहेत.

Story img Loader