शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ठरल्याप्रमाणे दुपारी चार वाजता शिवसेना भवानामध्ये शिवसेनेच्या अनेक नेत्यांसहीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा दाबव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणं खोटी असल्याचा दावा केलाय. इतक्यावरच न थांबता आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रणशिंग फुंकलं आहे, असंही राऊत म्हणालेत. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
“या पत्रकार परिषदेला येण्याआधीच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. ते सुद्धा ही पत्रकार परिषद पाहतायत. शरद पवारांचाही फोन आला होता. सकाळपासून महाविकास आघाडीतील वेगवेगळ्या लोकांचे फोन सुरु आहेत. सर्वांनी या पत्रकार परिषदेसाठी आशिर्वाद दिलेत,” असं राऊत पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हणाले.
तसेच पुढे बोलताना, “सर्वांनी आम्हाला पुढे व्हा असं सांगितलं. तसेच ही लढाईची सुरुवात आहे ती तुम्ही करा,” अशा शब्दांमध्ये प्रोत्साहन दिल्याचंही राऊत म्हणाले. “महाराष्ट्रावर, मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहे. त्या आक्रमणाविरोधात कोणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं ते आपण या ऐतिहासिक शिवसेना भवानाच्या वास्तूत फुंकतोय,” असंही राऊत म्हणाले.
“बाळासाहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला तो आयुष्यभराचा मंत्र आहे. ते नेहमी आम्हाला सांगायचे, तू काही पाप केलं नसेल, काही गुन्हा केला नसेल. तुमचं मन साफ असेल तर कोणाच्या बापाला घाबरु नका. आज उद्धव ठाकरे सुद्धा याच पद्धतीने शिवसेना पुढे घेऊन जातायत,” असंही राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी आम्हाला कधी गुडघे टेकवायला शिवलं नाही, असंही यावेळी राऊत म्हणाले.