शिवसेना खासदार संजय राऊत हे जाहीर पत्रकार परिषदेतून भाजपाच्या साडेतीन लोकांचा भांडाफोड करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. सोमवारी संजय राऊत यांनी “भाजपाचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं देखील विधान केलं होतं. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत या साडेतीन लोकांविषयी खुलासा करतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ईडी, किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या, वाधवान यांच्यावर निशाणा साधला. मात्र, या साडेतीन लोकांविषयी विचारणा केली असता राऊतांनी सूचक शब्दांत इशारा दिला आहे.
‘साडेतीन लोकां’चा संदर्भ काय?
“काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असं बोलत आहेत. मात्र, मला असं वाटतं की पुढील काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे,” असं संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत कोणत्या भाजपा नेत्यांविषयी गौप्यस्फोट करणार? याची चर्चा सुरू झाली होती.
Sanjay Raut Press Conference Live: हिंमत असेल तर ईडीने माझ्या घरी यावं – संजय राऊत
“२०२४नंतर बघू काय होतंय”
दरम्यान, संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ईडीनं त्यांच्या कुटुंबीयांविरोधात केलेल्या कारवाईवर टीका केली. “माझ्याशी संबंधित फक्त ५५ गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय? किती मोठं काम आहे ईडीकडे? सगळ्यांचं नोटिंग झालं आहे ते कोण आहेत ते.. बघू २०२४नंतर काय होतंय ते”, असा इशाराच राऊतांनी यावेळी दिला आहे.
भाजपाचे ‘ते’ साडेतीन लोक कोण?
दरम्यान, संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी ‘त्या’ साडेतीन लोकांविषयी कोणताही उल्लेख केला नाही. त्यामुळे अखेर उपस्थित पत्रकारांनीच त्यांना विचारणा केली असता संजय राऊत यांनी त्यावर सूचक संकेत दिले. “उद्यापासून तुम्हाला कळेल. कुणी अर्धा आहे, कुणी पाव आहे, कुणी चाराणेवाला आहे. हे जसजसे अटक होतील, तसतसे तुम्हाला समजतील”, असं संजय राऊत म्हणाले.