शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये विविध नेत्यांनी हजेरी लावली आहे. यापूर्वीच्या भागात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. आता खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये निवडणुका, ईडीवर भाष्य करत संजय राऊतांनी भाजपाला इशारा दिला आहे.

प्रोमोत संजय राऊत म्हणतात, “ज्या मराठी माणसाला भिकारी, घाटी, कोकणी म्हणलं जायचं. त्या माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मित्रपक्षाने फसवलं, म्हणून शिवसेना थांबली का? संपली का? शिवसेना म्हणजे अग्नीकुंड आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे.”

“उद्धव ठाकरेंनी पक्षांचं नेतृत्व स्वीकारल्यापासून बाळासाहेबांची संघटना दोन पाऊले पुढे नेली. भाजपाने ज्यापद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली, त्याबद्दल त्यांना क्षमा नाही. महापालिका निवडणूक घेण्यास घाबरतात. लोकसभा घेतील का नाही? अशी शंका आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

“शंभर भ्रष्टाचारी गोळा करून आपल्या पक्षात घ्यायचे, हे कोणतं बहुमत आहे? याला बहुमत नाही, व्यापार म्हणतात. ईडी ही दहशतवादी संघटना आहे. त्यांच्या बापाचे घर असल्यासारखं ताबा घेतात. शिवसेना ही सत्तेसाठी नाहीतर महाराष्ट्र आणि जनतेच्या संघर्षांसाठी जन्माला आली आहे. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल”, असेही संजय राऊतांनी सांगितलं.