शिवसेनेकडून ( शिंदे गट ) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा दिली जात होती. पण, शिवसेनेकडून ( शिंदे गट ) आज वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर देण्यात आलेल्या जाहिरातीमधून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची प्रतिमा ठळक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
जाहिरातीत काय?
शिवसेनेकडून ( शिंदे गट ) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात देण्यात आली आहे. पहिल्या पानावर देण्यात आलेल्या या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकत आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरातीत एका अंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात भाजपाला ३०.२ टक्के, शिवसेनेला १६.२ टक्के मतं मिळतील, असं अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून २६.१ तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी २३.२ टक्के जनतेने पसंती दिल्याचा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.
“आम्हीच शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला”
यावर संजय राऊत ट्वीट करत म्हणाले की, “कोट्यावधी रुपये खर्च करून केलेली ही जाहिरातबाजी. या आनंदाच्या क्षणी मा.मू. एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेमका विसर पडलाय.. आम्हीच शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला. जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकायला यांची तंतरली.”
“ये पब्लिक हैं.. सब जानती है”
“मोदी शाहांचे इतके भय? बाकी ते सर्व्हे… फडणवीस हे तुमचे चघळायचे विषय.. बाळासाहेबांचा फोटो टाकायला तंतरली हे मान्य करा.. ये पब्लिक हैं.. सब जानती है,” असंही संजय राऊतांनी म्हटलं.