बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. ते भाजपाच्या विरोधकांना एकत्र आणू पाहात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार यांनी देशातल्या अनेक मोठमोठ्या पक्षांच्या प्रमुखांना बिहारच्या पाटणा येथे आयोजित केलेल्या बैठकीला बोलावलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि विविध राजकीय पक्षांचे प्रमुख या बैठकीला आले होते. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या बैठकीचं निमंत्रण होतं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना आणि सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांना या बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार ठाकरे गटाकडून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे या बैठकीला गेले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल पटेल या बैठकीला गेले होते.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या बैठकीला आज हजेरी लावली. या बैठकीवेळी खासदार राऊत यांनी पाटण्यातला अनुभव सांगितला. संजय राऊत म्हणाले, पाटण्यातील बैठकीत वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. तिथे आलेल्या प्रत्येकाचा पक्ष होता, प्रत्येकाकडे स्वतःचं पक्षचिन्ह होतं. आपल्याकडे काहीच नाही, ना पक्ष, ना पक्षाचं चिन्ह. तरीसुद्धा आपल्याला तिथे सन्मानाने बोलावलं. मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतः विमानतळावर स्वागताला आले होते. याला भाग्य लागतं. हे भाग्य एखाद्या चक्रवर्ती राजालाच मिळू शकतं. त्यासाठी खुर्ची असायला हवी असं काही नाही. सिर्फ नाम ही काफी हैं.
हे ही वाचा >> “सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला”, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले, “तुमचंच भूत…”
संजय राऊत म्हणाले, पाटण्यात आम्ही काल जी दृष्य पाहिली, संपूर्ण देशातील लोक तिथे जमले होते. बैठकीनंतरर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. २०२४ साली महाराष्ट्रातून आणि देशातून हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याचा निश्चय तिथे करण्यात आला.