मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना महिविकास आघाडीने जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने मविआ नेत्यांसमोर ठेवला आहे. तसेच वंचितने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २७ जागांची मागणी केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, वंचितच्या या प्रस्तावावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीकरता जागावाटप करण्यासाठी महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांची बुधवारी सायंकाळी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीदेखील हजर होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मविआकडे लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २७ जागांची मागणी केली आहे. यावर आता मविआ नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वंचितच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाविकास आघाडीत कुठल्या पक्षाने किती जागा मागितल्या, कोणी किती दिल्या आणि किती जागा घेणार वगैरे या गोष्टींवर फारसा भर दिला जात नाही. आमची सर्वांची एकच मासनिकता आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारतीय जतना पार्टीला पराभूत करायचं आहे आणि देशाचं संविधान वाचवायचं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर) यांनीदेखील आमच्यासारखीच भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करू. लोकशाहीत वाटाघाटी होत असतात. अशा प्रकारची मागणी करणं चुकीचं नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते या प्रस्तावावर निर्णय घेतील.

दरम्यान, वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, वंचितच्या प्रस्तावाचा कागद सर्वांना मोठा दिसत असला तरी त्यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये केलेल्या कामांची माहिती आहे. त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. त्या संपूर्ण कामाची यादी वंचितने मविआला दिली आहे. त्यावर आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत. शेवटी आम्हाला सर्वांना या देशात आणि राज्यात लोकशाही आणायची आहे आणि आपलं संविधान टिकवायचं आहे. हाच आमचा आणि वंचितचा मुख्य अजेंडा आहे. आमच्याकडे एकूण ४८ जागा आहेत आणि त्या आम्ही चार पक्ष वाटून घेणार आहत.

मनोज जरांगेंबाबत वंचितची मागणी काय?

दरम्यान, महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून सर्वमान्य उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरवावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी आमच्याजवळ उशी कुठलीही मागणी केलेली नाही. हा वंचितचा पुढाकार आहे. मविआने मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कँडिडेट म्हणून जाहीर करावं, अशी आमची इच्छा आहे.

हे ही वाचा >> “मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…

महाविकास आघाडीने प्रस्तावाची बातमी नाकारली?

दरम्यान, मनोज जरांगेंच्या उमेदवारीबाबत संजय राऊत म्हणाले, आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही महाविकास आघाडीत केवळ जागावाटपावर चर्चा करत आहोत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction mahavikas aghadi manoj jarange patil jalna loksabha candidate vba proposal asc