Sanjay Raut on Shivsena BJP Alliance : एका लग्नसोहळ्यात उद्धव ठाकरे आणि भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. या भेटीत शिवसेना- भाजपा युतीसंदर्भात चर्चा झाली असून ही युती पुन्हा झाल्यस तो क्षण माझ्यासाठी सुवर्णक्षण असेल असं, चंद्रकांत पाटलांनी म्हटल्याची चर्चा आहे. या चर्चेवर आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजपा युतीचे समर्थक राहिले आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. विशेषतः शिवसेना-भाजपा युतीच्या संदर्भात जुनी पिढी होती, त्यात चंद्रकांत दादांसारखे नेते होते. भाजपात आता हौशे नवशे गौशे आले आहेत. त्यांना २५ वर्षांतील युतीचं महत्त्व कळणार नाही. त्यांचा भाजपाशी संबंध नाही, त्यांचा युतीशी संबंध नाही. पण चंद्रकांत पाटलांच्या ज्या भावना आहेत, तशा त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत. कारण आम्ही २५ वर्षे आम्ही त्यांच्याशी उत्तमपणे काम केलं. आम्ही नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही उत्तम काम केलंय. पण दिल्लीत अमित शाहांचा उदय झाल्यावर शिवसेना-भाजपात वितुष्ट आले. शिवसेना- युतीसंदर्भात सकारात्मक मुद्दा मांडल्याने चंद्रकांत पाटलांचे आभारी आहोत.”

दरम्यान,चंद्रकांत पाटलांनी ज्या भावना मांडल्या, त्याप्रमाणे शिवसेनेतील नेत्यांमध्येही भावना आहेत का? असा प्रश्नही संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, अशा भावना शिवसेना नेत्यांच्याही मनात असू शकतात. आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो त्याला कारण भाजपाच्या काही लोकांचा हट्ट. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो. २५ वर्षांची युती ज्या कारणांमुळे तुटली ती पाहिली तर आमची भूमिका योग्य होती. जे आम्ही मागत होतो, ते आमचा पक्ष फोडल्यावर एकनाथ शिंदेंना दिलं गेलं. आमची जी मागणी होती, तेव्हा ती अमित शाहांनी नाकारली. अमित शाहांनी ठरवून शिवेसना फोडायची होती. त्यांचे मुंबईत आर्थिक हितसंबंध गुंतले होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडून संपवायची होती. आजही एकनाथ शिंदेंचा वापर त्यासाठी करत आहेत”, अशीही टीका त्यांनी केली.

तुमच्यासाठीही सुवर्णक्षण असेल का?

शिवसेना-भाजपा युती झाल्यास तुमच्यासाठीही तो सुवर्णक्षण असेल का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, याचं उत्तर मी आता देऊ शकत नाही. पण योग्य वेळी उत्तर देऊ. माझ्याकडे आता याक्षणी पुरेसं उत्तर नाही. पण आम्ही पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत, याकडे पाहतोय. त्यामुळे वेट अॅण्ड वॉच करावं लागेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on chandrakant patil statement of shivsena bjp alliance will be golden moment sgk