उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या(४ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. उद्योजक आणि बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तींची ते भेट घेणार आहेत. याशिवाय ५ जानेवारी रोजी ते सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरातही ते जाणार आहेत.
मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात गेल्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. याशिवाय, मुंबईतील चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेशात नेण्यासंदर्भातही प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकल्या होत्या. या सर्व घडामोडींनंतर आता उत्तर प्रदेशच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या मुंबई दौऱ्यावर येत असून, ते उद्योजक आणि बॉलिवूडमधील दिग्गजांशी चर्चा करणार असल्याचे समोर आले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – “आधी शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात…” शिंदे-फडणवीसांना उद्देशून संजय राऊतांचं विधान!
“महाराष्ट्र हे औद्यागिक राज्य आहे. परदेशात सुद्धा लोक जातात उद्योग आणायला ते काही येत नाहीत. मुंबईमध्ये येऊन इथल्या उद्योगपतींशी चर्चा करायला कोणाचा विरोध नाही. जर इतर राज्यात सुद्धा तिकडचे उद्योजक गुंतवणूक करणार असतील. इथले कायम ठेवून, तर विरोध कशासाठी करायचा? हा देश एक आहे. उत्तर प्रदेशचे लाखो लोक इथे काम करतात. ते याच उद्योजकांच्या कारखान्यात काम करत आहेत. आमच्या मनात कोणत्याही राज्याविषयी द्वेष आणि सूड भावना नाही. राज्याचा विकास हा देशाचा विकास आहे. पण इकडलं पळवून नेण्याला आमचा विरोध आहे. आम्ही इकडचं ओरबडून घेऊ, पळवून नेवू याला आमचा विरोध आहे. या देशातील मोठे उद्योजक मुंबईत राहतात, मुंबई देशाची आर्थिक आणि औद्योगिक राजधानी आहे, पण ती आधी महाराष्ट्राची राजधानी आहे हे विसरू नका.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
याशिवाय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजपा व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.