लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचा फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं विधान भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच या विधानानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा महायुती सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही यावरू महायुतीवर टीकास्र सोडलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “महिलांना मदत व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी लाडकी योजना सुरु केलेली नाही. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठी आहे. मतदान होईपर्यंत ही योजना आहे. त्यामुळेच अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. महिलांना दबावाखाली आणलं जातं आहे. १५०० रुपयांत मत विकत घेण्याचा प्रकार आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा – Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
“महाविकास आघाडीच्या पंचसुत्रीनुसार आम्ही महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरु करणार आहे. त्यानुसार त्यांना तीन हजार रुपये दिले जातील. पण आम्ही त्यांचे फोटो काढणार नाही. खरं तर या योजना मत मिळवण्यासाठी नसतात. महिलांच्या विकासासाठी या योजना असतात. आज रुपये १५०० रुपये खूप मोठी रक्कम नाही. आज १४०० रुपयांला फक्त सिलिंडर येतं”, असेही ते म्हणाले.
धनंजय महाडिक काय म्हणाले होते?
धनंजय महाडिक यांनी काल कोल्हापुरातील एका सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं होतं. “जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या, ज्या महिला १५०० रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणतात. मग पैसे नकोत का? या पैशांचं राजकारण करता? आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागली तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचं. नको आहेत ना पैसे. लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. लगेच बंद, आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत”, असं ते म्हणाले होते.