Sanjay Raut on Leader of Opposition Party : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. यातच आज ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे.  त्यातच आता विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क आहे, असं विधान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलंय. ते आज माध्यमांशी बोलत होते.

आजपासून राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना गेले. त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता हवा यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. याकरता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत आज संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, “विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदाला मोठी परंपरा आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी चोख कामगिरी पार पाडलेली आहे. तुम्ही निवडून आलेला आहात, तुमचा विजय संशायस्पद असला तरीही विधानसभेत विरोधीपक्षनेता असल्याशिवाय लोकशाही विधिमंडळ पक्षला दिशा सापडणार नाही. मंत्र्यांची मनमानी चालू राहिल. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना वेसण घालण्यासाठी विरोधी पक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. ”

पुरेसे संख्याबळ नसताना पद कसं मिळेल?

विरोधी पक्षनेतेपदासाठी असलेलेय पुरेसे संख्याबळ नसल्याने शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाला विरोधी पक्षनेतेपद कसं मिळेल यावर संजय राऊत म्हणाले, “(संख्याबळ) असा कोणताही नियम नाही, अनेक राज्यात चार-पाच सदस्य असलेल्या पक्षांनाही लोकशाहीची बूज राखण्याकरता विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून ५० च्यावर आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होण्यास अडचण वाटत नाही.”

विरोधी पक्षनेते पदाचा संभाव्य उमेदवार कोण?

शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदाबाबात संभाव्य उमेदवार कोण? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “याबाबत विधिमंडळ पक्षाकडून निर्णय घेतला जाईल. याबाबत संभाव्य उमेदवार मला माहीत असला तरीही मी सांगणार नाही.”

Story img Loader