Sanjay Raut on Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात घमासान सुरू असून यावरून नागपुरात दंगल उसळली होती. राज्यात भाजपाचं सरकार असतानाही दंगली होत असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. तसंच, आता संजय राऊत यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, “दंगली का पेटवल्या जात आहेत? हा महाराष्ट्रात संशोधनाचा विषय आहे. होळीलाही वातावरण खराब केलं. राजापुरात काय केलं? होळीसारख्या सणाला महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील. औंरगजेबाची ढाल करून काही लोक दंगली करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबरीचं उदाहरण देत आहेत, बाबरीप्रमाणे आम्ही औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करत आहोत. सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत. आमचं असं म्हणणं आहे की सरकार तुमचं आहे ना मग दंगली का करताय? सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करावी.”
“तुमच्या मतदानातून आलेलं सरकार आहे. मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. काय चाललंय महाराष्ट्रात. आम्ही वारंवार सांगतोय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं ते प्रतिक आहे. औरंगजेब आला, अफझलखान, शाहिस्तेखान आला आणि परत नाही गेला. मावळ्यांनी आणि शिवाजी महाराजांनी त्यांची कबर येथेच खणली, हे शौर्याचं प्रतिक आहे. पण आरएसएसची विचारधारा अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं महत्त्व कमी करायचं, ही त्यांची पूर्वीपासून विचारधारा आहे”, अशीही टीका संजय राऊतांनी केली.
व्हिलनला संपवलं की हिरो संपेल
“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतिक नव्हतं. त्यामुळे व्हिलन संपवला की हिरो आपोआप संपतो, त्यामुळे व्हिलनवर हल्ला करून महाराष्ट्रातील हिरोंना संपवण्याची त्यांची भूमिका दिसते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिलं पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.
“१९९२ सालचा बाबरी मस्जिदचा लढा वेगळा होता. या लढ्याबाबत बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते, हे त्यांनी समजून घ्यावं. बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं की आम्हाला फक्त बाबरीमध्ये रस आहे. आम्हाला एक बाबरी द्या, बाकी सर्व कबरी आणि मस्जिदी तुमच्या आहेत. आम्ही तिथे ढुंकूनही पाहणार नाही. फक्त अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभं करू. जिथं अतिक्रमण झालं, त्याच जागेवर. या देशामध्ये हिंदू मुस्लिम यांनी सामंजस्याने राहिलं पाहिजे, तरच देश टीकेल ही बाळासाहेबांची भूमिका होती. रोज उठून एक मस्जिद आणि कबर तोडायची हे हिंदुत्त्व बाळासाहेबांनी कधी रुजवलं नाही आणि आम्हाला दिलं नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.