आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही नवीन जबाबदारी दिली नाही. पवारांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांची पक्षातील ताकद कमी करण्यासाठी शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर किंवा अन्य पक्षांच्या अंतर्गत घडामोडींवर दुसरं कुणी बोलू नये. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. आजच्या दिवशी २५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. ही ऐतिहासिक घटना होती. आज २५ वर्षानंतर त्या पक्षामध्ये जर काही नवीन घडामोडी घडत असतील. नवीन लोकांकडे जबाबदाऱ्या दिल्या जात असतील, तर त्यावर आम्ही का बोलावं? शरद पवार हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनीच त्या नियुक्त्या केल्या आहेत. त्या पक्षाचा रौप्यमहोत्सव साजरा होतोय, याला आमच्या शुभेच्छा आहेत.”

हेही वाचा- सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने अजित पवार नाराज? रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

यावेळी एका पत्रकाराने संजय राऊतांना उद्देशून विचारलं की, तुम्ही शरद पवारांचं राजकारण अगदी जवळून बघितलं आहे. अनेक निर्णयांचे तुम्ही साक्षीदार आहात. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीत घडलेल्या घटनांचं काय विश्लेषण करता येईल? शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले की त्यांचा पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला? यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “मला तरी तसं वाटत नाही. अजित पवार हे त्यांच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. तसेच ते विरोधी पक्षनेतेही आहेत. ही दोन्ही पदं फार महत्त्वाची आहेत. एवढंच मी सांगू इच्छितो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on ncp new appointments sharad pawar dominate ajit pawar rmm