Sanjay Raut on Neelam Gorhe and Sharad Pawar : “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”, असं वक्तव्य करून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय कल्लोळ केला. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या असून खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. तसंच, या प्रकरणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनीही निषेध व्यक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्याकरता दिल्लीत साहित्य संमेलन भरवलंत का? मराठी साहित्य महामंडळ आहे, जे खंडण्या घेऊन संमेलन भरतात. महामंडळ कार्यक्रम ठरवतात आणि आयोजक सतरंज्या उचलायला असतात. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले. त्यांचे पती सार्वजनिक विभागाचे अधिकारी आहेत. हे सर्वांत भ्रष्ट खातं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

मराठी साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे

“नीलम गोऱ्हेंचं कालचं वक्तव्य म्हणजे त्यांची विकृती आहे. मला आठवतंय, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ही कोणती बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? हे कोणतं ध्यान आणलं पक्षात? तरीही काही लोकांच्या मर्जीखातर त्या आल्या आणि चार वेळा आमदार झाल्या. आणि जाताना ताटात घाण करून गेल्या. या बाईचं विधान परिषदेचं कर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर पुण्याचे गटनेते होते अशोक हरनावळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या. मग हे मर्सिडिज प्रकरण कळेल. विनायक पांडे यांना उमेदवार देण्याकता त्यांनी किती पैसे घेतले होते, हेही त्यांना जाऊन विचारा. त्यांनी नंतर या बाईकडून पैसे वसूल केले होते. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत. आम्ही दूर झालो, पण तुम्ही अशा प्रकारे विधानं करता. ज्यांनी तुम्हाला आमदार केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना. मराठी साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे. विश्वासघातकी बाई”, असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला.

“राजकीय चिखलफेक झालीय, त्याची जबाबदारी शरद पवारही झिडकारू शकत नाहीत. ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्याप्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले, राजकीय चिखलफेक झाली, तेही तितकेच जबाबदार आहेत. पवारांनी निषेध व्यक्त केला पाहिजे. ते कसे गप्प राहू शकतात? त्यांच्यावर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो”,असंही राऊत म्हणाले.

“नीलम गोऱ्हे बाई नाही. तो बाईमाणूस आहे. नीलम गोऱ्हे माफी मागण्याच्या लायकीच्या नाहीत”, अशी तीव्र शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला.

Story img Loader