Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील दोन प्रमुख नेते एकत्र येणार, अशी चर्चा शनिवारपासून सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षातील ‘युती’समर्थकांनी श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला दिला आहे. तसंच, परदेश दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनीही त्यांच्या नेत्यांना प्रतिक्षा करण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे २९ एप्रिलला मुंबईत दाखल होणार आहे. तेव्हाच या संदर्भातील निर्यण जाहीर केला जाईल, असं मनसे नेत्यांनी सांगितलंय. तर, ठाकरे गटाचे संजय राऊत यांनीही यासंदर्भात सुतोवाच केले आहेत. ते आज माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे मुंबईत नसून ते कुठे गेलेत हे माहीत नाही. त्यांनी एक हात पुढे केला आहे, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. आपण इथेच थांबायला हवं. काही दिवस जाऊयात. मनसे प्रमुखांना मुंबईत येऊद्यात. त्यानंतर आपण चर्चा करू. रोज त्यावर चर्चा करून त्या विषयाचं गांभीर्य का घालवायचं? हा लोकांच्या मनातील विषय आहे. हा विषय जिवंतच राहणार आहे. त्यांच्या नात्यात कोणीही येऊन चर्चा करण्याची गरज नाही. या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहात राहून पाहिलंय.त्यांच्या एकमेकांविषयी काय भावना आहेत हे मला माहितेय. या सगळ्यांची जाणीव मलासुद्धा आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नाहीत. तसंच, या युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक आहेत.”
रिपब्लिकन चळवळीतील प्रमुखानेही आमच्याशी संपर्क साधला
“ज्यांना- ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं आहे त्यांनी यावं. रिपब्लिकन चळवळीच्या गटातील प्रमुखाने आम्हाला फोन केला होता. आम्हालाही मराठीसाठी एकत्र यायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील तर आम्हालाही मागे राहता येणार नाही. जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र, मराठी माणसाची एकजूट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे रिपब्लिक चळवळीतील अनेकांनी संपर्क करायला सुरुवात केली आहे”, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
मी तर दोन्ही घरचा पाहुणा
“(युतीच्या निमित्ताने) दोन भाऊ जर भेटणार असतील तर भेटुद्यात. आम्हीही त्यांच्याबरोबर असू. मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे. उद्धव ठाकरे काय, आम्ही काय आणि राज ठाकरे काय आम्ही बराच काळ एकत्र राहिलेली माणसं आहोत. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि माझं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले. पण भावनेचा ओलावा असतो. आम्ही राजकीय दृष्ट्या भांडत राहिलो. शरद पवारांशीही भांडलो. पण ओलावा राहिला. महाराष्ट्रातील राजकारणात तुम्हाला कटुताच हवी का? महाराष्ट्रातील राजकारणात कटुता आणि विष हे भाजपाने तयार केलं. नाहीतर महाराष्ट्र असा कधीच नव्हता. ओठात एक आणि पोटात एक असं कधीच नव्हतं”, असंही ते म्हणाले.