समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना शहापूर येथे भीषण अपघात होऊन १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. क्रेन आणि स्लॅब अंगावर कोसळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताप्रकरणी आता संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. समृद्धीइतके बळी कोणत्याच रस्त्याने घेतले नाहीत, असं संजय राऊत थेट म्हणाले आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवरही टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “या देशात अनेक महामार्ग निर्माण झाले, मोठ मोठे रस्ते एक्स्प्रेस वे निर्माण झाले. युतीच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे निर्माण झाला. पण इतके बळी कोणत्या रस्त्याने घेतले नव्हते, ते समृद्धीने घेतले.”
हेही वाचा >> “…मगच त्या व्यासपीठावर जा”, लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी पुण्यात येणाऱ्या मोदींना राऊतांचं थेट आव्हान
“श्रद्धा की अंधश्रद्धा काहीही म्हणा. हा महामार्ग निर्माण करताना लोकांच्या सुपिक जमिनी, बागायत शेती फक्त आपल्या स्वार्थासाठी, ठेकेदारांच्या फायद्यासाठी ओरबाडून घेतल्या. त्याचा हा शाप आहे. इतके या रस्त्यावर बळी गेले आहेत, लोक यापुढे महामार्गाचा वापर करायला घाबरतील. लोकांचे, शेतकऱ्यांचे शिव्याशाप आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.
शहापूर येथे काय घडलं?
शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळ खुटाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. तब्बल १०० फूट उंच व सव्वा दोन किमी लांबीच्या पुलाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असताना गर्डर लाँचर करताना तांत्रिक कारणामुळे अचानक कोसळला व १७ कामगारांचा यामध्ये मृत्यू झाला. हे सर्व कामगार उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू असे परप्रांतीय असल्याने याठिकाणी मोठा गजहब झाला नाही.