Sanjay Raut on Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील दोन आरोपींना आत ताब्यात घेण्यात आली. पुण्यातून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून अजून एक आरोपी फरार आहे. याप्रकरणी योग्य तपास सुरू असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. तसंच, येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे बीडमधील देशमुख कुटुंबीय आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ते आज माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “संतोष देशमुख हत्याप्रकरणावर रोज प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. हे प्रकरण पोलिसांच्या तपासात आहे, आणि न्यायप्रविष्ट आहे. ज्या दिवशी आपल्याला वाटेल योग्य दिशेने तपास केला जात नाहीय, तेव्हा आपण प्रश्न विचारू. पोलिसांनी आणि सीआयडीने केलेल्या कारवाईवर विश्वास ठेवला पाहिजे. पोलीस तपासात बाधा येईल, असं काही करू नये.”

ते पुढे म्हणाले, “खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. धस बोलत आहेत, ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा बीडमधील हा दहशतवाद मोडून काढायचा आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय तेव्हा आम्ही यावर नक्की बोलू.”

हेही वाचा >> Santosh Deshmukh Murder : “सगळे आरोपी पुण्यातच सापडले, त्यांना आश्रय कोणी दिला?”, संंतोष देशमुख हत्याप्रकरणी भावाचा सवाल; रोख कोणावर?

“परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडचे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत. आम्ही वाट पाहत आहोत की पोलीस काय करणार आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोघेजण पुण्यातून ताब्यात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली. हत्येला २५ दिवस होऊनही अद्याप मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती. यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

एकूण सात आरोपी

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत. विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींना याआधीच अटक करण्यात आली होती. यानंतर आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे.

कोण आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुले?

मस्साजोग गावातील अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्प असलेल्या परिसरात ६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राडा घातला होता. अवादा कंपनीच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक असलेल्या मस्साजोग गावातील युवकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याचाच राग मनात धरून केज तालुक्यातील टाकळी गावात राहणाऱ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली.

सुदर्शन घुले (वय २६) हा ऊस तोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये मारहाण आणि अपहरणाच्या गुन्ह्याचा समावेश आहे.

y