Sanjay Raut : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीस आले असताना न्यायाधीशांनी महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. ठाणे दंडाधिकारी चौकशी अहवालात या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं न्यायालयाने नोंदवलं आहे. बार अॅन्ड बेंचने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.या प्रकरणी आता खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
सध्या गेम करण्याचं करण्याची प्रकरणं वाढली आहेत. तीन पक्ष सत्तेत आहेत. मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळ विस्तार ते पालकमंत्री कोण होणार? या सगळ्यावरुनच गेम चालले आहेत एक दिवस कुणाचा तरी मोठा गेम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात आहेत. महाराष्ट्रात लाखो कोटींची गुंतवणूक त्यांना आणायची आहे. ते येताना एक हजार कोटींची वगैरे गुंतवणूक आणतील एन्काऊंटर वगैरे छोट्या गोष्टी आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
राजकीय फायद्यासाठी पोलिसांचं बळी जाणं नेहमीचंच-राऊत
राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी घेणं हे नेहमीचंच झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्या आदेशावरुन हे केलं आहे त्यांचा बळी जाणारच आहे. न्यायालयाने ठरवलं की कायदेशीर कारवाई करायची तर त्यांच्यावर ३०२ च्या अंतर्गत कारवाई होईल. लखनभैय्या तुरुंगात २० पोलिसांना जन्मठेप झाली या प्रकरणात तशा गोष्टी घडू शकतात. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राहुल शेवाळेंना कुंभमेळ्यात जाण्याचा सल्ला
राहुल शेवाळे काय बोलतात त्यावर राजकारण चालत नाही. त्यांच्याकडे काय काम आहे? याला फोडा, त्याला विकत घ्या. उद्या ते असंही म्हणतील की डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आहेत, त्यांच्या पक्षाचे २०-२५ खासदार आमच्या पक्षात येत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतल्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यानधारणा करण्याची गरज आहे कारण त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीत
अक्षय शिंदेबरोबर झालेल्या भांडणात पाच पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर ‘अयोग्य’ होता आणि त्याच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, बंदुकीवर मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे नाहीत. त्याने स्व-बचावासाठी गोळीबार केल्याची पोलिसांची भूमिका अन्यायकारक आणि संशयाच्या छायेत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्या सहाय्याने खंडपीठाला माहिती दिली की राज्य कायद्यानुसार कारवाई करणार आहे आणि गुन्हा दाखल केला जाईल.