Sanjay Raut : ठाण्यातल्या तलावपाळी या ठिकाणी अनेक साहित्यिक कार्यक्रम झाले आहेत. ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळाली. ठाण्याने सुसंस्कृत नेते निर्माण केले. या ठाण्याने अनेक नेतेही निर्माण केले. मो. दा. जोशी, आनंद दिघे अशी अनेक नावं घेता येतील. ज्या आनंद दिघेंना मुख्यमंत्री गुरु मानतात त्यांच्या वास्तूत गुंडांनी आणि टार्गट पोरांनी लेडीज बार असल्याप्रमाणे पैसे उधळले. अशी टीका संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केली. जो हा उपक्रम साजरा केला ते चित्र विचलित करणारं आहे. मी कालही म्हटलं की जिथे आनंद दिघे बसत होते तिथे हंटर लावलेला असायचा. त्याचा अर्थ असा होता की चुकाल तर हंटर बसेल. जर आज आनंद दिघे असते तर लेडीज बारवाल्या मिंधे सेनेला आणि त्यांच्या बॉसला चाबकाने फोडून काढलं असतं असं म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आनंद आश्रमात जे घडलं त्यावर जोरदार टीका केली.
मिंधेंनी आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला
आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा मिंधेंनी घेतला आहे. पारशांचा तो ट्रस्ट होता, तसंच ती आनंद दिघेंची मालमत्ता आहे. आनंद दिघे हे काही तुमचे काही खासगी नाहीत. तुमची संस्कृती काय आहे ते दिसलं. मिंधे सेनेचे सरदार यांचीही ही संस्कृती आहे जी खालपर्यंत झिरपली आहे. बाकी पदावरुन काढलं वगैरे ही सगळी नौटंकी आहे. अशीही टीका संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केली
नितीन गडकरींबाबत काय म्हणाले संजय राऊत?
नितीन गडकरी हे भाजपातले एक सर्वमान्य असे नेते आहेत. पंतप्रधानपदासाठी तडजोड करा असं त्यांना कुणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. या देशात हुकूमशाही, एकाधिकारशाही सुरु आहे, आणीबाणी लावण्याचा प्रय़त्न सुरु आहे त्याच्याशी तडजोड करु नका अशी भूमिका विरोधी पक्षातल्या नेत्याने त्यांच्याकडे मांडली असेल तर त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही. आज सरकारमध्ये बसून देशातल्या मूल्यांशी तडजोड केली जाते तो राष्ट्रीय अपराध आहे असं मी मानतो. नितीन गडकरी सातत्याने या विरोधात बोलतात, त्यामुळे विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्याने सल्ला दिला असेल तर त्यात पिडा कुणाला होण्याचं कारण नाही. देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर काहींना त्याग करावा लागतो. असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.
“तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आमचा पाठिंबा, त्या नेत्याने..”, गडकरींचं वक्तव्य चर्चेत
काय म्हणाले नितीन गडकरी?
“मला चांगलं लक्षात आहे, मी कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल? तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी मूल्यं, विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे. भारतीय लोकशाहीचा आधार असलेली ही मूल्यं आहेत.” असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. ही चर्चा नेमकी कुणाशी झाली? तसंच कधी झाली ? याचे तपशील नितीन गडकरींनी दिले नाहीत. मात्र त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आहे.